Talegaon News : सुशांतसिंग, कंगना प्रकरणातून जनतेला मूर्ख बनविण्याचा केंद्राचा डाव – बाळासाहेब ढोरे

कामगारांची कपात करून त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम मोदी सरकार करत असल्याचा आरोपही ढोरे यांनी केला.

एमपीसीन्यूज : देशातील जनता भिकेला लागली असताना मोदी सरकार सुशांत सिंग, कंगना राणावत यांचे भांडवल करून लोकांना मूर्ख बनविण्याचे काम करीत आहे. यामाध्यमातून देशातील मूळ प्रश्नांवरुन जनतेचे लक्ष विचलित करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केंद्रातील सत्ताधारी भाजपा करत आहेत. त्यामुळे मिस्ड कॉल अभियान राबवून केंद्रापर्यंत सामान्य लोकांचे प्रश्न पोहोचवा, असे आवाहन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी केले.

मावळ तालुका युवक काँग्रेसचे वतीने आज, बुधवारी तळेगाव दाभाडे जिजामाता चौक येथे रोजगार मिस्ड कॉल अभियानातंर्गत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विलास मालपोटे, वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयुर ढोरे,  उपाध्यक्ष ॲड. अक्षय पोटे, लिगल सेल अध्यक्ष ॲड. सुधीर भोंगाडे, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष जितेंद्र खळदे, तसेच तळेगाव शहर अध्यक्ष विशाल वाळुंज उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

बाळासाहेब ढोरे म्हणाले, मोदी सरकार दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करणार होते. मात्र, सध्याची परिस्थिती उलट झाली आहे. आजमितीस भारतात जवळजवळ दोन कोटी तरुण बेरोजगार झाले आहेत. हाताला काम नाही, खायला अन्न नाही अशी भयानक परिस्थिती उद्भवली आहे.

केंद्रातर्फे महाराष्ट्र सरकारला मदत मिळणे बंद झाले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाची भयंकर परिस्थिती असतात साधे पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर मिळणे बंद झाले आहे.

तसेच राज्याचे कर आणि जीडीपीच्या हिश्श्याचे 22  हजार कोटी रुपये केंद्र सरकार देत नाही. नोटबंदी आणि सरकारी क्षेत्रातील कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या सपाट केंद्राने लावला आहे. कामगारांची कपात करून त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम मोदी सरकार करत असल्याचा आरोपही ढोरे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.