Talegaon News : संपूर्ण व्याज माफ होत नाही, तो पर्यंत नागरिकांनी पाणी पट्टी भरु नये – किशोर आवारे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील नागरिकांनी जो पर्यंत संपूर्ण व्याज माफी मिळत नाही, तो पर्यंत पाणी पट्टीची देयके (बिले) भरू नये असे आवाहन जनसेवा विकास समितीचे संस्थापक, अध्यक्ष किशोर आवारे  यांनी नागरिकांना केले आहे. 

सन 2016- 2017 तसेच सन 2017-2018 या काळात पाणी बिलांचे वाटपच झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. योग्य वेळेत पाणी बिले वाटलीच गेली नाहीत त्यामुळे पाणी बिलांचा भरणा होऊ शकला नाही व न भरलेल्या पाणी बिलासाठी विलंब शुल्क व वार्षिक 24% दंडणीय व्याज आकारले जात असल्याने, जो पर्यंत संपूर्ण व्याज माफ होत नाही तोपर्यंत पाणीपट्टी  भरू नये, असे जनसेवा विकास समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच योग्य वेळेत पाणी बिलांचे वाटप का झाले नाही याचे स्पष्टीकरण नगर प्रशासनाने करावे अशी मागणी आवारे यांनी केली.

सन 2016-17 व सन 2017-18 या  आर्थिक वर्षातील पाणीपट्टी बिलांबाबत नगर परिषद प्रशासन संभ्रमात राहिल्याने पाणीपट्टी देयके गृह निर्माण संस्थांना देण्यात आलेली नाहीत. या करिता सन 2018- 19 पासून  विभागीय आयुक्त पुणे यांचे दिनांक 26-05-2016 चे आदेशानुसार पाणीपट्टी बिले ही मीटरच्या प्रत्यक्ष रीडिंग नुसार व दोन महिन्यांच्या सरासरी वापरानुसार निर्माण झालेल्या पूर्वलक्षी  प्रभावाने देण्यात आली आहेत.

नगर परिषदेने मागणी बिल दिल्यानंतर 90 दिवसात रक्कम भरणे आवश्यक आहे, अशी रकम न भरल्यास त्यास प्रति महिना 2% प्रमाणे दंडनीय व्याज महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 कलम 150 अ नुसार आकारले जाते. सदर दंडनीय व्याज हे जाचक स्वरूपाचे असून, नगर प्रशासनाने व्याजाचा सखोल विचार करून नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच पाणी बिलांचे वाटप योग्य वेळेत का झाले नाही याचा खुलासा नगराध्यक्षांनी करावा असे मत विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी व्यक्त केले.

पाणी बिलात व्याज माफ करण्यात यावे या बाबतचा निर्णय  जिल्हाअधिकारी पुणे यांचेकडे प्रलंबित आहे, जर पाणी बिल व्याज माफ झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांकडून व्याजाची वसुली व्हावी, अशी मागणी गटनेते किशोर भेगडे यांनी केली. कोरोना काळातील लॉक डाऊनमुळे  आर्थिक अडचणीत असलेल्या स्थानिक नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे जनसेवा विकास समिती राहील असे नगरसेवक निखिल भगत यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.