Talegaon News : दिवाळीची खरेदी करून घराकडे निघालेल्या मायलेकीच्या दुचाकीला कंटेनरची धडक; आईचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – दिवाळीची खरेदी करून माय लेकी मोपेड दुचाकीवरून घरी जात असताना कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत मायलेकी रस्त्यावर पडल्या. मुलगी जखमी झाली तर आईचा कंटेनरच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 8) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास तळेगाव स्टेशन चौकात घडली.

कालिता संतोष तोरकडे (वय 37, रा. कान्हे फाटा, ता. मावळ. मूळ रा. लातूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत कालिता यांची मुलगी देविका संतोष तोरकडे (वय 20) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कंटेनर चालक रवी कमल सिंग (रा. आवधन, ता. जि. धुळे. मूळ रा. हरियाणा) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देविका आणि तिची आई मयत कालिता या दोघी कान्हे फाटा येथून रविवारी दुपारी मोपेड दुचाकीवरून (एम एच 24 / ए एन 6424) तळेगाव दाभाडे येथे दिवाळीच्या खरेदीसाठी आल्या होत्या. सुमारे दीड तासात त्यांनी सर्व खरेदी केली आणि पावणे चार वाजता घरी जाण्यासाठी निघाल्या.

तळेगाव स्टेशन चौकात आल्यानंतर एका कंटेनरने (एच आर 55 / वाय 7342) पाठीमागून दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये देविका समोरच्या बाजूला पडल्याने ती जखमी झाली. तर आई कालिता दुचाकीच्या मागच्या बाजूला पडल्या आणि कंटेनरच्या मागच्या चाकाखाली आल्या. त्यात चिरडून कालिता यांचा जागीच मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.