Talegaon News : मावळ बंदला प्रतिसाद न देता दैनंदिन व्यवहार सुरु ठेवा : बबनराव भेगडे

मावळ बंदची हाक म्हणजे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न

एमपीसीन्यूज : बाळासाहेब नेवाळे यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो सचिवांनी दाखल केला आहे. यात सत्ताधारी पक्षाचा काडीचाही संबंध नाही. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र, या प्रकरणावरून आता भाजपने पुकारलेला मावळ बंद हा अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केला.

मावळमधील सर्वसामान्य नागरिक, दुकानदार यांनी या बंदला प्रतिसाद न देता दैनंदिन व्यवहार सुरु ठेवावेत, असे आवाहनही भेगडे यांनी केले आहे.

भेगडे पुढे म्हणाले, मागील पंचवीस वर्षापासून सत्ता उपभोगत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या जनतेने विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव करत त्यांना जागा दाखवून दिली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नावनोंदणीचा गाजावाजा करूनही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही ८० टक्के ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व इतर मित्र पक्षाचे (महाविकासआघाडीचे) सदस्य निवडून आहेत. आता ऐन सरपंचपदाच्या निवडणुकीच्या दिवशीच भाजपने मावळ बंदची हाक दिली आहे.

हा बंद केवळ अपयश लपवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. हे समजण्यासाठी मावळची जनता दुधखुळी नाही. कोरोनामुळे सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्यामुळे बंदला कोणीही प्रतिसाद देणार नाही. हा बंद अयशस्वी होईल, अशी खात्री आहे.

ज्या प्रकरणामुळे भाजप नेते राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करीत आहेत. त्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप अथवा दबाव कुणी आणलेला नाही. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे भेगडे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.