Talegaon News : मेधाविन फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्धा मातांचा सत्कार

एमपीसी न्यूज : महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नसून सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्त्वामुळेच संस्कारक्षम पिढी व समाज घडविण्याची शक्ती महिलांमध्येच आहे. असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी केले.

मेधाविन फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कोरोना योद्धा मातांचा सत्कार समारंभाप्रसंगी जाधव बोलत होते. यावेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे, नगरसेविका मंगल भेगडे, उद्योजिका राजश्री म्हस्के, माजी नगरअध्यक्षा माया भेगडे, मेघा भागवत, जयश्री पाटील,मीरा म्हस्के आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना जाधव म्हणाले की, महिला सर्वच क्षेत्रात सर्वाधिक काम करत असतात. नवनिर्माण करण्याची दैवी शक्ती फक्त आणि फक्त स्त्रियांमध्ये उपजत असते. त्यामुळे ती आदिशक्ती असून त्यातून शक्तीशाली समाज घडू शकते. असे विचार आपल्या मनोगतात किशोर भेगडे यांनी व्यक्त केले.

तर कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात जेव्हा जवळचे नातेवाईक देखील अंत्यसंस्काराला येऊ शकले नाहीत, त्यावेळी ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालुन सेवा दिली त्यांच्या मातांचा सत्कार करण्याचे फाउंडेशननी ठरवले असे संस्थापिका वैशाली दाभाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली दाभाडे यांनी केले,स्वागत निशा पवार, सूत्रसंचालन स्वाती दाभाडे यांनी तर आभार ज्योती शिंदे यांनी मानले.

या वेळी फाउंडेशनच्या सदस्या उद्योजीका स्वाती पवार, रश्मी जगदाळे,पल्लवी भेगडे, संगीता अगरवाल,कु शिवानी सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.