Talegaon News : मायमर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू; मनसे महिला आघाडीचे लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील  मायमर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे, असा आरोप करत मनसे देहूरोड शहर महिला आघाडीच्या वतीने जनरल हॉस्पिटलच्या बाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

याबाबत मनसे महिला आघाडीच्या देहूरोड शहर अध्यक्षा अनिता मंगवानी यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि तळेगाव पोलिसांना निवेदन देण्यात आले.

मनसे महिला आघाडीच्या अनिता मंगवानी, सुनीता देवर, नीरजा ठोसर, प्रियांका ठोसर यांनी हे उपोषण आंदोलन सुरु केले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,  मंगवानी यांच्या नातेवाईक बबनबाई परशुराम मोरे (वय 78, रा. पारशीचाळ, देहूरोड) यांना 21 जुलै रोजी उलट्या आणि चक्कर येत असल्याने तळेगाव स्टेशन येथील मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मात्र, रुग्णालयाने 21 ते 26 जुलै या कालावधीत मोरे यांना कोरोना संशयित म्हणून कोविड वॉर्डमध्ये ठेवले. त्या सहा दिवसात मोरे यांच्यावर रुग्णालयाने कोणतेही उपचार केले नाहीत. पैशांच्या अभावी रुग्णालयाने मोरे या वृद्ध महिला रुग्णाकडे दुर्लक्ष केले.

_MPC_DIR_MPU_II

योग्य उपचार न मिळाल्याने मोरे यांचा 1 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. हा मृत्यू रुग्णालयाच्या निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणामुळे झाला आहे. यासाठी मायमर हॉस्पिटल सर्वस्वी जबाबदार आहे. योग्य उपचार झाले असते तर मोरे यांचा जीव वाचला असता.

मोरे यांच्या उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू असतानाही रुग्णाकडून हॉस्पिटलने बिले घेतली आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

हॉस्पिटल प्रशासनाच्या बेजबाबदारपणाच्या विरोधात मनसे देहूरोड शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता मंगवानी यांनी गुरुवारी (दि. 3) रुग्णालयाच्या बाहेर एक दिवसीय लाक्षणिक केले.

मनसेचे मावळ तालुक्यातील पदाधिकारी मोझेस दास,  संजय शिंदे, भरत बोडके, निरंजन चव्हाण तसेच पिंपरी चिंचवडचे कैलास कदम यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसेच महाराष्ट्र विकास समितीच्या शिष्टमंडळानेही आंदोलनकर्त्यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला.

दरम्यान, या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला  मात्र संपर्क होऊ  शकला नाही. रुग्णालय प्रशासनाची प्रतिक्रिया उपलब्ध झाल्यास ती या बातमीत समाविष्ट केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.