Talegaon News : देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तळेगाव दाभाडे शहराचे युवा अध्यक्ष तुषार काळोखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

प्रदीप नाईक यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्याच्या पूरग्रस्त भागात नुकसानीची पाहणी करीत आहेत. बुधवारी (दि. 28) सातारा जिल्ह्यातील पाटण येथे त्यांनी भेट दिली. पूरग्रस्तांची आपुलकीने चौकशी केली. झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांना धीर दिला. हे सर्व करत असताना त्यांनी पूरग्रस्त बांधवांच्या आग्रहास्तव त्यांच्या सोबत भोजन केले.

या दौऱ्याच्या व्हिडीओला आणि बदनामीकारक आवाज जोडून तुषार काळोखे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले. समाजातील काही मंडळी आपली कुवत नसताना समाज माध्यमातून राजकीय नेत्यांना बदनाम करण्याचे काम करीत असतात. काळोखे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

या घटनेचा निषेध म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन दिले. दरम्यान त्यांनी या विषयावर भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्याशी चर्चा करून, त्यांच्या मार्गदर्शनानुसार या बाबतीत पाऊल उचलले असल्याचे नाईक यांनी सांगितले. तुषार काळोखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नाईक यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.