Talegaon News : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी बुधवारपासून धरणे आंदोलन : किशोर आवारे

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे वेतन त्वरित द्यावे; अन्यथा बुधवार (दि.२३) पासून धरणे आंदोलन करण्याचा इशारा जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे व प्रवक्ते मिलिंद अच्युत व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

या बाबतचे निवेदन मंगळवारी (दि.२२) मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नगरपरिषद मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे व पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांना दिले आहे.

नगरपरिषद विद्यूत विभाग, अग्निशमन विभाग व कार्यालयीन आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनासंबंधित मागण्यांबाबत जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांना साकडे घातले होते. आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आवारे यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी या कामगारांनी केली होती.

कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून शहरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरु ठेवण्याचे उत्कृष्ट काम विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यांना फेब्रुवारी २०२१ पासून त्यांचे वेतन दिले गेले नाही. वेतन नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकीरीचे झाले आहे. आई वडिलांचा वैद्यकीय खर्च, घर भाडे, किराणा, मुलाचे शिक्षण व हफ्ते आदी भरण्यासाठी तसेच जगण्यासाठी जवळ पैसे नसल्याने त्यांना खासगी सावकाराचा आश्रय घ्यावा लागत आहे.

कंत्राटी कर्मचारी वारंवार वेतन देण्याची मागणी करत आहे. याकडे नगरपरिषद प्रशासन व ठेकेदार कानाडोळा करत आहे. मुजोर अधिकारी व ठेकेदाराच्या कारभाराला कंत्राटी कर्मचारी वैतागले आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार वेतन दिले जात नाही. कंत्राटी कामगार बांधवांच्या वेतनाबाबत कोणतेही राजकारण न करता त्वरित मागण्या मान्य करण्याचे आवाहन किशोर आवारे यांनी केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या वेतन व इतर मागण्यांकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनसेवा विकास समिती बुधवार (दि.२३) पासून बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.