Talegaon News : पार्थ पवार फाउंडेशनतर्फे सोमाटणे येथे अन्नधान्य वाटप

एमपीसीन्यूज : पार्थ पवार फाउंडेशन तळेगाव यांच्यावतीने सोमाटणे येथील चौराईनगर येथील आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा 25 कुटुंबाना अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती नगरसेवक संतोष भेगडे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती अशी, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने जगात थैमान घातल्याने अनेक लोकांचे रोजचे काम कमी झाले काहींचे बंदच पडले त्यामुळे जवळची बचत संपली आणि रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला.

ही गोष्ट पार्थ पवार फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना समजली व आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून त्यांनी अशा मंडळींना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या दीड वर्षात सुमारे 4 ते साडेचार हजार कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.

सोमाटणे चौराई नगर या भागात वासुदेव समाजाचे काही लोक वास्तव्यास आहेत आणि सध्या त्यांचे गावोगाव फिरणे बंद असल्याने त्यांची रोजच्या जेवणाची सुद्धा मारामार होत आहे. याबाबत माहिती मिळताच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष भेगडे यांनी या सर्व कुटुंबाना गहु, तांदूळ, साखर,तेल, डाळ, मीठ, चहा पावडर, हळद, साबण, मसाला,भाजी,रक्तवाढीच्या गोळ्या, सॅनिटायझर,मास्क असे एक महिनाभर पुरेल एवढे किराणा आणि आरोग्यासाठी आवश्यक असणारे साहित्य पोहोच केले.

हे साहित्य पाहून या लोकांच्या चेहऱ्यावर काही काळ का होईना समाधान निर्माण करू शकलो याचा आनंद असल्याचे भेगडे यांनी सांगितले. भविष्यातही असेच सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.