Talegaon News: निराशेच्या अंधारात आशेचा दीप प्रज्वलित करणारी ‘कलापिनी’ची दिवाळी पहाट!

एमपीसी न्यूज (विश्वास देशपांडे) – कलापिनीच्या संगीत, साहित्य, नृत्य अशा विविध प्रकाराने नटलेल्या, ग्रामीण भागातील पहिल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाची वाट सर्वच रसिक आतुरतेने वाट पाहत असतात. कलापिनी व हिंदविजय नागरी पतसंस्था आयोजित दिवाळी पहाट ‘गाऊ त्यांना आरती’ आज (शनिवारी) उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाली.

एक पणती त्यांच्यासाठी ज्यांनी रचिला पाया |
वृक्ष येथे लावूनी गेले गर्द सावली छाया ||
एक पणती त्यांच्यासाठी विश्वच जपले सारे |
धरतीवरती सेवा झाले आकाशातील तारे ||
पवित्र प्रांगण मानवतेचे दर्शन घडले जनसेवेचे |
संकट समयी जपली नाती
गाऊ त्यांना आरती…

या कलापिनी कलाकार दिनेश कुलकर्णी यांच्या कवितेवर आधारित रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या दिवाळी पहाटचे हे 24 वे वर्ष.

या प्रसंगी हिंदविजय नागरी पतसंस्थेचे संस्थापक अॅड. रवींद्र दाभाडे, विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ दाभाडे, संचालक सुधाकर देशमुख, कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर आणि संस्थेच्या उपाध्यक्षा अंजलीताई सहस्रबुद्धे, विनायक भालेराव, व्यवस्थाप्रमुख संजय मालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘शब्दांचा हा खेळ मांडला’ हा विदुषक या चित्रपटातील गण प्रणव केसकर, सावनी परगी, शार्दुल गद्रे, आदित्य धामणकर, हरीश पाटील आणि सहकारी यांनी सादर करून दमदार सुरुवात झाली त्यानंतर विनायक लिमये यांनी सादर केलेल्या ‘गोविंद दामोदर’ या स्तोत्राने वातावरण भाविक केले.

या वातावरणात प्रमुख पाहुणे रवींद्र दाभाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. आपल्या मनोगतात त्यांनी कलापिनीचे कौतुक करून कलापिनी संस्था केवळ मावळचाच नव्हे तर पुणे जिल्हाचा, महाराष्ट्राचा अभिमान आहे, असे सांगितले व कलापिनीच्या सर्व उपक्रमांना व नवीन रंगमंच उभारणी साठी जास्तीत जास्त सहाय्य करण्याचे अभिवचन दिले.

त्यानंतर ‘तेजोन्मय चिन्मया’ या विनायक लिमये यांच्या गाण्याने व त्यावर आधारित नृत्याने तसेच प्रणव केसकर, विनायक लिमये, अक्षय म्हाप्रळकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भूपाळीच्या मेडलीने रसिकांना वेगळ्या विश्वात नेले.

सावनी परगी यांच्या ‘नवल वर्तले गे माये’ व ‘माझिया नयनाच्या कोंदणी’ (डॉ.प्राची पांडे ) या गीतांना उत्तम दाद मिळाली. अनघा बुरसे यांनी सादर केलेल्या शिंपीण पक्षीणीच्या कथेने काळजाचा ठाव घेतला.

‘खोप्या मध्ये खोपा सुगरणीचा’ ही रचना मेधा रानडे यांनी सादर करून रसिकांची दाद मिळवली

सूर्य अष्टक रचनेवर आधारित बहारदार नेत्रदीपक नृत्य रचना मीनल कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी सादर करून रंगत वाढविली. पंडित विनोदभूषण आल्पे यांनी भटियार रागातली चीज व ‘काया ही पंढरी’ हा सुंदर अभंग सादर केला.

‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे’ ही कविवर्य बा.भ.बोरकरांची रचना प्रणव केसकर या कलापिनीच्या युवा कलाकाराने सदर करून रसिकांना अंतर्मुख केले ह्या गीताची स्वररचना विनायक लिमये यांची होती.

त्यानंतर कवी यशवंत रचित ‘गाऊ त्यांना आरती’ हे विनायक लिमये यांनी स्वरबद्ध केलेले या दिवाळी पहाटचे शीर्षक गीत सादर केले. मधुराष्टक या रचनेवर मीनल कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी सदर केलेले नृत्य आठवणीत राहणारे होते.

या नंतर ‘सांगा ना कसं जगायचं’ हे कविता श्रीधर कुलकर्णी आणि सहकारी ‘झटकून टाक जीवा’, ‘डाव मांडून मांडून मोडू नको’, ‘बिकट वाट वहिवाट’ अशी एका पेक्षा एक सुंदर गाणी मैफिलीची रंगत वाढवणारी होती.

‘चमचम नीळं पाण्याचं तळं’ (गायक अवनी परांजपे) हे बहारदार नृत्य सादर झाले. विपुल परदेशी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘मन शुद्ध तुझं’ या जोशपूर्ण नृत्याने मनाचा ठाव घेऊन ठेका धरायला लावला.

पंडित विनोदभूषण आल्पे यांनी सादर केलेल्या ‘तू माझी माउली’ या अभंगाने आणि सर्व कलाकारांनी सादर केलेल्या ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या भैरवीने दिवाळी पहाटची सांगता झाली.

या सुंदर कार्यक्रमात मीनल कुलकर्णी आणि सहकारी, विपुल परदेशी, अविनाश शिंदे, संदीप मानकर, मुक्ता भावसार, शरयू पवनीकर यांचे नृत्य दिग्दर्शन होते.

या कार्यक्रमात कलापिनीच्या बाल व्यक्तिमत्व शिबिरात धडे घेतलेल्या कु. साईशा सरमळकर या 13 वर्षांच्या मुलीने इंग्रजीतून लिहिलेल्या ‘सेकंड फॉर्मर सन राइस अॅकॅडमी, एलिअन्स डायरी आणि फर्स्ट टर्म अॅट सन राइस अॅकेडमी या पुस्तकांबद्दल गौरव करण्यात आला तसेच सुनिधी प्रकाशन च्या लॉकडाऊन पॉझीटीव्ही,जादूचा मेंदू (डॉ.श्रुती पानसे), हरव्या गप्पा (प्रीता नागनाथ) या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ झाला सुनिधी प्रकाशन च्या धनश्री बेडेकर उपस्थित होत्या.

लॉकडाऊन पॉझीटीव्ही या पुस्तकात कलापिनीचे विश्वस्त शिरीष जोशी व कार्यकारिणी सदस्य शर्मिला शहा यांनी लॉकडाऊन काळात केलेल्या सकारात्मक कार्याची माहिती आहे. त्यानिमित्त त्यांचा गौरव करण्यात आला. कलापिनीचा कलाकार व अनेक जणांना प्लाझ्मा दान करणारा करोनायोद्धा महेश सोनपावले यांचाही गौरव करण्यात आला.

मंगेश राजहंस (तबला), प्रवीण ढवळे, योगीराज राजहंस (ताल वाद्य) व प्रदीप जोशी, (संवादिनी) तर राजेश झिरपे (सिंथेसायझर) यांच्या उत्तम साथ संगतीने दिवाळी पहाटची रंगत वाढवली

डॉ. विनया केसकर, डॉ. अनंत परांजपे यांनी निवेदनाची बाजू उत्तम सांभाळली. सुमेर नंदेश्वर यांनी ध्वनीसंयोजन केले. अनिरुद्ध जोशी व हितेश शिंदे यांनी छायाचित्रणाची बाजू सांभाळली

शार्दुल गद्रे प्रतीक मेहता,विनायक काळे,चेतन पंडित,आदित्य धामणकर,चैतन्य जोशी यांच्या तंत्र सहाय्यामुळे हा कार्यक्रम कलापिनीच्या फेसबुक पेजवर जगभरातल्या सर्व रसिकांना बघता आला.

सायली रौन्धळ, श्रीधर कुलकर्णी, तेजश्री गांधी, अशोक बकरे, रश्मी पांढरे, श्रीपाद बुरसे, रामचंद्र रानडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहाय्य केले.

हा कार्यक्रम कोविड 19 संबधी सर्व नियम पाळून मोजक्या उपस्थितीत कलापिनी सांस्कृतिक केंद्रात संपन्न झाला व कलापिनी फेसबुक पेज वर लाईव्ह करण्यात आला हा कार्यक्रम जगभरातील सुमारे 5 हजार 300 रसिकांपर्यंत पोहचला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.