Talegaon News : ‘तळेगावमधील जनरल मोटर्स कंपनी बंद करण्यासाठी  परवानगी देऊ नका’

खासदार बारणे यांची मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि  कामगार मंत्र्यांकडे मागणी

एमपीसीन्यूज :  मावळ तालुक्यातील तळेगांव दाभाडे एमआयडीसीतील जनरल मोटर्स कंपनीने कामगार हिताचा विचार न करता कंपनी बंद करण्याचा व  विकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी बंद झाल्यास येथील 3578  कामगारांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे  कंपनी बंद करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगांव एमआयडीसी या ठिकाणी जनरल मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 2007 मध्ये  सुरू झाली. कंपनीमध्ये महाराष्ट्रातील व विविध भागातील तसेच स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, या उद्देशाने कंपनीने महाराष्ट्र शासन व भारत सरकारकडून अनेक सोई सुविधा मिळवत  करांमध्ये सवलती घेतल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

कंपनीला अशा प्रकारच्या सोई सुविधा देवून देखील जनरल मोटर्स प्रा. लि. ने ही कंपनी चीनच्या ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीला विकली आहे. तसेच  या कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडे कंपनी बंद करण्याची परवानगी मागितली आहे.

या कंपनीमध्ये कायमस्वरूपी 1578  कामगार  व 2000 कामगार कॉन्ट्रेक्ट पद्धतीने असे एकूण 3578 कामगार काम करत आहेत.

जनरल मोटर्स कंपनीने कामगार हिताचा कोणताही विचार न करता कंपनी बंद करण्याचा आणि विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी बंद झाल्यास येथील कामगारांवर उपासमारीची वेळ येईल. याबाबत जनरल कामगार मोटर्स कामगार संघटनेकडून व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले होते.

परंतु, त्यावर आजतागायत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.  तेथील कामगारांना न्याय देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कंपनी बंद करण्याची परवानगी देवू नये, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.