Talegaon News : खाजगी शैक्षणिक संस्थेचे शिक्षक व मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करू नका : आमदार सुनिल शेळके

तळेगाव दाभाडे – राज्यभरात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही आरोग्य मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहीमेत लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, पोलीस पाटील, नगरपरिषद कर्मचारी, शिक्षक, मुख्याध्यापक व सामाजिक स्वयंसेवी संस्था यांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन शासनाने केले होते.

गुरुवार (दि२४) रोजी तळेगाव दाभाडे शहरात ही आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत असून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. या मोहिमेत शासकीय यंत्रणेसोबत सर्व क्षेत्रातील स्वयंसेवकांचा सहभाग गरजेचा आहे.

परंतु अनेक खाजगी शैक्षणिक संस्थाचे शिक्षक व मुख्याध्यापक या आरोग्य मोहिमेत सहभागी होत नसल्याने प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी जे या मोहिमेत सहभाग होत नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

_MPC_DIR_MPU_II

मात्र खाजगी शैक्षणिक संस्थाचे संस्थाचालक आम्हाला या मोहिमेत काम करू देत नाहीत. आमच्यावर त्यांचा दबाव येत असल्याने आम्ही या आरोग्य मोहिमेत काम करू शकत नाही, अशी सत्य स्थिती त्यांनी आमदार शेळके यांच्याकडे मांडली.

आमची या मोहिमेत काम करण्याची इच्छा असूनही आम्हाला काम करण्यास मज्जाव केला जात आहे. त्यामुळे आमच्यावर कारवाई करू नये, अशी विनंती शिक्षक व मुख्याध्यापक यांनी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे केली आहे.

“शिक्षक वर्ग सध्या द्विधा मनःस्थितीत असून त्यांनी आजपर्यंत कोरोना संकटकाळातही आपले कर्तव्य बजावले आहे. परंतु संस्थाचालकांच्या दबावामुळे खाजगी शैक्षणिक संस्थांचे शिक्षक व मुख्याध्यापक जे या मोहिमेत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नयेत, अशी विनंती प्रांताधिकारी यांना केली आहे.” असे शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.