Talegaon News : निधीअभावी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राची अद्ययावत इमारत वापराविना धूळीत

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषदेने तळेगाव शहरात प्राथमिक आरोग्य केंद्राची अद्ययावत इमारत बांधून पूर्ण केली आहे; मात्र इमारतीच्या विद्युत कामासाठी लागणारा निधीच उपलब्ध होत नसल्याने नवीन इमारत वापराविना धूळखात पडली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.

पुणे जिल्हा परिषदेने सन 2019 मध्ये 2 कोटी 50 लाख रुपये खर्चाची तरतूद असलेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरु केले. हे काम ऑक्टोबर 2020 मध्ये पूर्ण झाले आहे. पण या इमारतीसाठी लागणाऱ्या विद्युतीकरणास जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध होत नसल्याने रखडले आहे.

तळेगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी दोन मजले असलेल्या या अद्यावत इमारतीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. या इमारतीमध्ये रुग्ण नोंदणी कक्ष, दोन बाह्य रुग्ण तपासणी कक्ष, औषध वाटप कक्ष, औषध भांडार, रक्त,लघवी तपासणी प्रयोगशाळा, प्रसूतीगृह, प्रसूती तपासणी कक्ष, हिरकणी कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, वैद्यकीय अधिकारी विश्रामगृह, सभागृह आदि सुविधांचा समावेश या इमारतीमध्ये करण्यात आला आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्रावर तळेगाव शहर आणि परिसरातील 16 गावामधील नागरिक उपचार घेत असतात. दररोज सुमारे 150 ते 200 रुग्ण तपासणी व औषधे घेऊन जातात. सध्या रुग्णाच्या तपासणी व औषधे देण्याची व्यवस्था नगर परिषदेच्या सुभाष मार्केट येथील लहानशा गाळ्यामध्ये केलेली आहे. या ठिकाणी जागा अपुरी असल्याने रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.तसेच या रुग्णालयात होणाऱ्या महिलांच्या कुटुंब नियोजन व इतर शस्त्रक्रिया जागेअभावी बंद झाल्याने त्या रुग्णांना इतरत्र जावे लागत आहे.

या बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीच्या विद्युत करणासाठी त्वरित निधी उपलब्ध करून रुग्णाची गैरसोय टाळावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.