Talegaon News : शिक्षणाला औद्योगिक प्रशिक्षणाची गरज; नूतन महाराष्ट्र संस्थेतील तज्ञांच्या बैठकीतील सूर

एमपीसी न्यूज: शैक्षणिक पदवी ही कौशल्याधिष्ठीत असली पाहिजे आणि महाविद्यालयीन शिक्षणाला औद्योगिक प्रशिक्षणाची जोड मिळाली पाहिजे, असा सूर नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या इंडस्ट्री इन्स्टिट्यूट परिसंवादात विविध तज्ज्ञांनी व्यक्त केला. याप्रसंगी अरेना मल्टीमीडिया पुणे, आशय मेजरमेंट्स आणि प्रोशिका इंजिनिअर्स या अस्थापनांशी नूतन महाराष्ट्र संस्थेशी करार करण्यात आले.

माजी राज्यमंत्री व नूतन महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, पीएमए संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे, आयईईईचे चेअरमन गिरीश खिलारी, एल अँड टीचे डेप्युटी जनरल मॅनेजर अजित ठाकूर, तळेगाव दाभाडे इंडस्ट्री असोसिएशनचे दीपक जायगुडे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचे विलास रबडे, नूतन महाराष्ट्र संस्थेचे सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, महेश शहा, प्लेसमेंट अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे, प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा आदी उपस्थित होते.

तांत्रिकी क्षेत्राच्या गरजा पूर्ण करणारा व तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा बी. व्होकेशनल पदवीधर तयार करणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. शैक्षणिक संस्था व उद्योग यांच्यात परस्पर संवाद होणे ही काळाची गरज आहे. तसेच तळेगावच्या स्थानाचा विचार करता आजूबाजूच्या उद्योग विश्वामध्ये मोठ्या संधी तेथील परिसरात कौशल्याशिष्ठीत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना असल्याचे मत संजय भेगडे यांनी व्यक्त केले.

जागतिक स्पर्धेत गुणवत्ता महत्वाची आहे. त्यामुळे कौशल्यावर आधारित शिक्षणाला पर्याय नसल्याचे आणि नवीन शैक्षणिक धोरणान्वये व पंतप्रधान विकास योजनेप्रमाणे शिक्षण संस्थांनी उपक्रम राबवले तर तरुणांना नोकरी व व्यवसायात चांगली प्रगती करता येईल, असे अनुक्रमे प्रदीप तुपे व अजित ठाकूर यांनी सांगितले.

ब-याच उद्योग क्षेत्रातील कर्मचारी हे कार्यालयीन कामकाजातील वेळेत व्यत्यय न आणता पुढील उच्च शिक्षणासाठी इच्छुक असतात, त्यांनादेखील संस्थेतील बी. व्होक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन आपली पदवी संपादन करता येईल, असे म्हस्के यांनी सांगितले.

सूत्रसंचालन प्रा. पूजा शर्मा यांनी केले. नियोजन प्रा. दिनेश जाधव, विजय शिर्के, प्रा. मिलिंद ओव्हाळ, श्रद्धा किरवे, नीलिमा घाडगे, मयूर पिंगळे, मंगेश काळे, डॉ. संजय सांगे, प्रसाद ढोरे, प्रेमकुमार कोल्ले, सागर जोशी, सुषमा भोसले, राहुल पाटील, अंकुष पाटील आदींनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.