Talegaon News : शैक्षणिक संस्थांनी फी वसुलीसाठी तगादा लावू नये : आमदार सुनील शेळके

पालक संघर्ष समितीच्या आंदोलनाला आमदार शेळके यांचा पाठिंबा

एमपीसीन्यूज : कोरोना संकटामुळे अनेकांचे उद्योग-व्यवसाय मंदीत असून काही पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा वेळी शैक्षणिक संस्थांनी फी वसुलीसाठी तगादा लावू नये. फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी करून घेणे, पालकांना अर्वाच्च भाषेत बोलणे, अपमानास्पद वागणूक यामुळे पालकांचे व विद्यार्थ्यांचे मनोबल खचत असून ही बाब अतिशय गंभीर असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

शैक्षणिक संस्थांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पालक संघर्ष समितीच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात सुरू करण्यात आलेल्या उपोषण आंदोलनाला आमदार सुनिल शेळके यांनी भेट देत पाठिंबा दिला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषद उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेवक अरुण माने, नगरसेविका मंगल भेगडे, आशिष खांडगे व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार शेळके म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काबाबत योग्य निर्णय संस्थाचालकांनी घेतला पाहिजे. मी या लढ्यात पालकांच्या सोबत आहे. खाजगी शाळांकडून पालकांची आणि विद्यार्थ्यांची अडवणूक होत असताना पालकांपुढे आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नाही.

अनेक पालक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची दखल या शाळांच्या संस्थाचालकांना घ्यावीच लागेल, नाहीतर यापुढे अधिक तीव्र मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे आमदार शेळके म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.