Talegaon News : महामार्गाचे काम मार्गी लावण्यासाठी कृती समितीची स्थापना

एमपीसी न्यूज – तळेगाव – चाकण महामार्गाची दुरावस्था झाली असल्याने वाहतुक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. रखडलेल्या महामार्गाची कामे मार्गी लावण्यासाठी तळेगाव – चाकण महामार्ग कृती समितीची स्थापना केली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी येलवाडी (ता.खेड) येथील नितीन सखाराम गाडे यांची तर मावळ मधून कार्यकारिणी सदस्य म्हणून दिलीप डोळस, अमित प्रभावळकर, संजय चव्हाण, गणेश बोरूडे या चार जणांची निवड करण्यात आली आहे.

अपघात आणि वाहतुक कोंडीमुळे वर्षानुवर्षे चर्चेत असलेल्या तळेगाव-चाकण महामार्गासंदर्भातील प्रलंबित समस्यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी मावळ आणि खेड तालुक्यातील सदस्यांनी तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्यातील दिलीप डोळस, अमित प्रभावळकर, गणेश बोरुडे, संजय चव्हाण तसेच खेड तालुक्यातील तुकाराम काळे, बाजीराव गायकवाड, चंद्रकांत बोत्रे, नितीन पवार, सतीश कड, नवनाथ शेडगे, अप्पासाहेब दौंडकर, संदेश जाधव आदी सदस्यांचा समितीमध्ये समावेश आहे.

पुणे जिल्ह्याला जेएनपीटी बंदराशी जोडणा-या तळेगाव-चाकण महामार्गावरील रहदारीत गेल्या दशकभरात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, उदासीन राजकीय नेतृत्वांमुळे या महामार्गाची दुरावस्था कायम आहे. मंजुरी मिळून दोन वर्षे झाली तरीही अद्याप हा राष्ट्रीय महामार्ग कागदावरच आहे. महामार्गाच्या कामाचा डीपीआर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे अपेक्षित असताना अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.परिणामी नित्याची वाहतुक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

मुळातच अरुंद असलेल्या या रस्त्यावरील खड्डे, अतिक्रमणे आणि अवजड वाहनांच्या पार्कींगमुळे आजपर्यंत झालेल्या अपघातात अनेक निष्पापांना या महामार्गावरील अपघातात जीव गमवावा लागला आहे. त्यामुळेच अस्तित्वातील तळेगाव – चाकण मार्गाचे रुंदीकरण मजबुतीकरण होऊन राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यासाठी पाठपुरावा आणि वेळप्रसंगी संघर्ष करण्यासाठी कृती समितीची स्थापना केल्याचे अध्यक्ष नितीन गाडे पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.