Talegaon News : दीड महिन्यानंतरही स्वीकृत सदस्यांचे राजीनामे मंजुरीच्या प्रतीक्षेत

इच्छुकांच्या प्रतिक्षांवर विरजण

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील दोन स्वीकृत सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले. याला आता दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्यापही हे राजीनामे मंजूर झालेले नाहीत. दरम्यान स्वीकृत सदस्य पदासाठी अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे वर्णी लावली. राजीनामे मंजूर होत नसल्याने नवीन सदस्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे इच्छुकांच्या प्रतिक्षांवर विरजण पडले आहे. तसेच तळेगाव शहरातील राजकीय वर्तुळात साधकबाधक चर्चाही रंगू लागल्या आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत सदस्य सुरेश दाभाडे आणि जनसेवा विकास समितीचे स्वीकृत सदस्य रवींद्र आवारे यांनी आपल्या पदाचे राजीनामे 15 डिसेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले असून अद्यापि राजीनामा मंजुरीचा जिल्हाधिकारी यांचा आदेश नगरपरिषदेस प्राप्त झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सुरेश दाभाडे आणि रवींद्र आवारे यांनी 15 डिसेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात समक्ष उपस्थित राहून स्वीकृत सदस्य पदाचा राजीनामा दिला.

पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे स्वीकृत सदस्य पदाचा राजीनामा स्वखुशीने व आनंदाने देत असल्याचे दाभाडे आणि आवारे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. सुमारे दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही दोघांचेही राजीनामे मंजूर होऊ शकलेले नाहीत! या मागचे गौडबंगाल काय आहे? याची राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

14 ऑगस्ट 2019 रोजी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गणेश काकडे,भाजपाचे सुरेश दाभाडे आणि जनसेवा विकास समितीचे रवींद्र आवारे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली.

त्यानंतर दाभाडे आणि आवारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला.राजीनामा मंजूर न झाल्याने दोघाही सदस्यांनी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेस हजेरीही लावली आहे.

दाभाडे आणि आवारे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त होणाऱ्या जागेसाठी इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या. या पदावर आपली वर्णी लागावी म्हणून अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे ‘फिल्डिंग’ही लावली. सध्या तरी इच्छुक उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.