Talegaon News : खासगी शाळांची फी माफ करावी अन्यथा उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा

एमपीसी न्यूज – इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रशासन पालकांकडून अवाजवी फी आकारत असून शाळांची फी माफ करावी. अन्यथा उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी तथा विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडे नगरसेवक व आरटीआय कार्यकर्ते अरुण माने व जमीर नालबंद यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

माने यांनी निवेदनात म्हटले आहे की, सन 2019- 20 मध्ये संपुर्ण जगात आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या कालावधीत शाळा संपुर्ण बंद राहिल्या आहेत. या महामारीमध्ये नागरिकांचे रोजगार, धंदा, शेती व नोकरी पुर्णपणे बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नागरिक वेगवेगळ्या कर्जाचे हप्ते भरण्यास असमर्थ असल्याने त्रस्त झाले आहेत. अनेकांच्या नोक-याही गेल्या आहेत.

या कालावधीत शाळा संपुर्ण बंद असताना देखील अशा परिस्थितीत शाळा प्रशासन पालकांकडे फीसाठी एकसारखा तगादा लावत आहे. फी भरताना रोख स्वरूपातच फी भरावी असे शाळा प्रशासनाकडून पालकांना सांगितले जात असल्याचे निवेदनात माने यांनी म्हटले आहे.

आपण शासनामार्फत सर्व शाळांना पालकांकडून फी घेण्यास मनाई करून ती माफ करावी अन्यथा सोमवार दि 28 डिसेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात उपोषण करण्याचा इशारा माने यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत मावळचे आमदार सुनील शेळके यांनाही दिल्याचे पालकांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.