Talegaon News -… अखेर स्वीकृत नगरसेवकांचे राजीनामे मंजूर!

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या जनसेवा विकास समितीचे रवींद्र गंगाराम आवारे व भारतीय जनता पक्षाचे सुरेश यशवंत दाभाडे या दोन स्वीकृत सदस्यांनी दिलेले नगरसेवक पदाचे राजीनामे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंजूर केले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील या दोन स्वीकृत सदस्यांनी पक्षाने नेमून दिलेला आपला कालावधी पूर्ण होताच आपल्या पदाचे राजीनामे यापूर्वी डिसेंबर महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले होते, परंतु त्याठिकाणी वेळेत निर्णय न लागल्यामुळे त्या दोघांनी पुन्हा दुस-यांदा आपले राजीनामे जिल्हाधिकाऱ्यांकडे (दि. 23) फेब्रुवारी रोजी सादर केले. ते आता मंजूरही झाले असून पुढील कार्यवाहीसाठी नगरपरिषद प्रशासनाकडे सुपूर्द केले असल्याची माहिती नगराध्यक्षा चित्रा जगनाडे व उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी दिली.

नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून राजीनामे स्वखुशीने देत असल्याचे दोघांही नगरसेवकांनी सांगितले. 14 ऑगस्ट 2019 रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहात स्वीकृत नगरसेवकपदासाठी निवडणूक झाली होती.त्यावेळी या दोघांनी पदभार स्वीकारला होता.

जनसेवा विकास समितीचे रवींद्र आवारे व भारतीय जनता पक्षाचे सुरेश दाभाडे यांच्या राजीनाम्यानंतर इच्छुकांसाठी अखेर मार्ग मोकळा होऊन पक्षातील इतर इच्छुकांच्या आशा या पदांसाठी पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांनी आपली वर्णी लागावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे संपर्क वाढवला आहे.

यावेळी या पदांकरिता महिला तीव्र इच्छुक आहेत. आतापर्यंत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या इतिहासात महिलांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळालेली नव्हती, मात्र यावेळी ती आशा धरून महिला तीव्र इच्छुक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.