Talegaon News: ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान स्मारक समिती गठीत करा’ – गणेश काकडे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. या निवास स्थानाबाबत विविध नियोजन करणे, निर्णय घेणे, आढावा घेणे यासाठी नगरपरिषद सदस्यांची ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान स्मारक समिती’ तत्काळ गठीत करावी. नगरपरिषदेकडून तरतूद करण्यात आलेला निधी या समितीकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी केली आहे.

याबाबत नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात विरोधी पक्षनेते काकडे यांनी म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे या शहरामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. याठिकाणी भारतीय राज्यघटना लिहिण्याचे ऐतिहासिक कार्य झाले आहे. या वास्तुचे मालक म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषद अशी नोंद आहे. या ठिकाणी देशातील विविध भागातून, तसेच परदेशातूनही अनेक नागरिक भेट देत असतात. यामुळे या जागेस ऐतिहासिक महत्त्व आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्यामार्फत या ऐतिहासिक वास्तुच्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. यासाठी राज्य सरकारने 1 कोटी 11 लाख इतके अनुदान मंजूर केले आहे. या वास्तुची दैनंदिन देखभाल दुरुस्ती होणे. वास्तुच्या विकासाबाबत व इतर निर्णय घेणे. यासाठी यापूर्वीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगरपरिषदेच्या सदस्यांची समिती गठीत केली होती. परंतु, या पंचवार्षिकमध्ये मागील चार वर्षांपासून अशी समिती गठीत करण्यात आलेली नाही. यामुळे या वास्तुबाबत कोणतेही विकासकामांचे नगरपरिषद स्तरावर निर्णय घेता येत नाहीत.

त्यामुळे तत्काळ समिती गठीत करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान, जयंतीकरिता नगरपरिषदेने तरतूद केलेला निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान स्मारक समितीकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते काकडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.