Talegaon News : नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा तीन दिवसात 7 वेळा तहकूब

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा तीन दिवसामध्ये 7 वेळा तहकूब होऊन देखील सभेचे कामकाज अपूर्णच राहिले. त्यातच ठेकेदार व अधिकारी यांचे संगनमत तसेच अधिकाऱ्यांकडून चुकीची आणि दिशाहीन माहिती सभागृहात दिली जात असल्याने नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत संताप व्यक्त केला; तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

सोमवारी तहकूब झालेली सभा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेस उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे सभागृहात उपस्थित होते.

नगरपरिषदेच्या कार्यालयात ठेकेदाराच्या माध्यमातून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार नियमाप्रमाणे तसेच करारानुसार दिले जात नसल्यामुळे किमान वेतन कायद्याचा भंग होत असल्याचा आरोप सभागृहात गटनेते किशोर भेगडे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक संतोष भेगडे यांनी आक्रमकपणे केल्याने तसेच या ठेकेदारास देण्यात येणाऱ्या बिलाची चौकशी करावी. याशिवाय नगराध्यक्षांचे कोणीही ऐकत नाही. त्यांचा प्रशासनावर अंकुश नाही असे म्हणत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तसेच नगरपरिषदेच्या इतर अनेक ठेकेदारांच्या कामकाजाची व आर्थिक व्यवहारांची देखील चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.

नगरपरिषदेच्या वार्षिक लेख्यांची माहिती अपूर्ण असून संबंधित खात्याचे सर्व अधिकारी त्यांच्या कागदपत्रांसह हजर ठेवा. खोटी माहिती देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. सभेत सभागृह नेते अमोल शेटे, अरूण भेगडे पाटील, शोभा भेगडे, कल्पना भोपळे, विभावरी दाभाडे, वैशाली दाभाडे, हेमलता खळदे, रवींद्र आवारे आदींनी अधिकाऱ्यांची मनमानी सर्वांच्या निदर्शनास आणून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.