Talegaon News : तळेगावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करा – आयुष प्रसाद

गरज भासल्यास 24 तासात हजार बेडचे कोविड केअर सेंटर उभारु - आमदार सुनिल शेळके

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट ठरलेल्या तळेगाव दाभाडे येथील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी आढावा बैठकीचे शुक्रवारी (दि. 30) रोजी नगरपरिषद सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद व आमदार सुनिल शेळके यांनी मार्गदर्शन केले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत असून लॉकडाऊन नंतरही रुग्ण संख्या नियंत्रणात येत नसल्याने तळेगावातील सुमारे १७०० घरांमध्ये जाऊन सर्वे करा. यासाठी मायक्रो प्लॅनिंग नुसार प्रत्येक घरातील शेवटच्या माणसापर्यंत जाऊन पाहणी करण्यात यावी. यासाठी आवश्यक मनुष्यबळ गटविकास अधिकारी यांनी दिलेले शिक्षक, नगरपरिषद कर्मचारी, सफाई कर्मचारी, स्वयंसेवक यांच्या माध्यमातून उपलब्ध करून घ्यावे. प्रत्येक हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना यामध्ये सहभागी करून घ्यावे. संशयित नागरिकांची टेस्ट करावी. स्वॅब घेण्यासाठी ट्रेनिंग देऊन माणसे तयार करावी.

ज्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशा नागरिकांना लक्षणानुसार, वयानुसार व त्यांना असणारे आजारानुसार कोविड केअर सेंटर, ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी दाखल करण्यास सहकार्य करावे. तसेच ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यांच्या हाय रिस्क मधील २० जणांचे नमुने घेऊन तपासणी करावी. या सर्वांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभा करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आयुष प्रसाद यांनी आढावा बैठकीच्या वेळेस केल्या.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील वॉर्ड क्रमांक 5,6,7,2, 1, 12 या ठिकाणी सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. नव्याने सर्वेक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी सर्वाधिक रुग्ण आढळतील अशा ठिकाणी कडक लॉकडाऊन करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी दिले. यासाठी पोलिस प्रशासनाने नाकाबंदी करत कंटेनमेंट झोनमध्ये केवळ एकच इंट्री व एक्झिट पॉईंट ठेवावा असे त्यांनी सांगितले.

मावळ तालुक्यात असलेल्या बहुतांश दवाखान्यांमध्ये सुमारे ६० टक्के रुग्ण हे बाहेरील आहे. यामुळे तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यांमध्ये जागा कमी पडत आहेत. तळेगावमध्ये हजार बेडचे कोविड केअर सेंटर २४ तासात उभे करू. ऑक्सिजन, रेमडीसीवर इंजेक्शन, व्हेंटिलेटर आदी साठी पाठपुरावा करू. या कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था करू. नगरपरिषदेला कुठल्याही प्रकारचे मदत लागली तर ती करायला तयार आहे. परंतु जोपर्यंत नगरपरिषदेतील नगरसेवक ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करणार नाही, तोपर्यंत रुग्णांचे निदान होऊन खरा आकडा बाहेर येणार नाही. आणि जेवढ्या लवकर निदान होईल तेवढ्या लवकर रुग्णांना बरेही करता येईल. यासाठी नगरसेवकांनीही पुढे येण्याची गरज असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

नागरिक व नगरपरिषद यांचे समन्वय राहण्यासाठी वॉर रूम तयार करा. वॉर रूम मधील संपर्क क्रमांक सगळीकडे प्रसारित करा. नगरपरिषदेच्या वतीने असणाऱ्या मोफत ॲम्बुलन्सचा संपर्क क्रमांक सर्व नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. नगरसेवक, कर्मचारी, अधिकारी यांचे भागानुसार व्हाट्सअप ग्रुप करून दररोजचे अपडेट यामध्ये कळवा. तसेच नगरसेवक व वरिष्ठ अधिकारी यांचादेखील एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून आरोग्यविषयक सल्लामसलत व आवश्यक गोष्टींची चर्चा यामध्ये करा असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुनिल शेळके, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, तहसीलदार मधुसूदन बर्गे, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटनेते अरुण भेगडे, नगरसेवक अरुण माने, गणेश खांडगे, समीर खांडगे, संतोष दाभाडे, शोभा भेगडे, वैशाली दाभाडे, संगीता शेळके, काजल गटे, कल्पना भोपळे, हेमलता खळदे, नीता काळोखे व नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.