Talegaon News : ‘सलून व्यवसायिकांसह कामगारांना आर्थिक मदत करा’

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या संकटामुळे जाहीर केलेल्या लाॅकडाऊनमुळे शहर व परिसरातील केश कर्तनालय बंद ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या व्यवसायावर अवलंबून असणारे कुटुंबिय व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना दुसरा कोणताच आधार नसल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नाभिक संघटनेकडून होत आहे.

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे सर्व मानवी जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. असंख्य छोटे-मोठे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यातीलच केश कर्तनालय दुकानदार हा एक मुख्य आणि महत्त्वाचा घटक आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहरातील सलुनची दुकाने बंद आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणा-या सुमारे तिनशे कामगारांचे आर्थिकदृष्ट्या हाल होत आहे. ते अडचणीत सापडले आहेत. शहरात 120 ते 125 सलुनची दुकाने आहेत. यामध्ये तिनशे कामगार काम करतात.

सध्याच्या काळात व्यवसाय बंद असल्याने त्यांचे हाल होत असून त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे. हा व्यावसायिक अडचणीतून मार्ग क्रमण करत आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांचे मानसिक मनोबलही ढासळले आहे.

हा व्यवसाय काही दिवसांपासून बंद असल्याने असंख्य देणी बाकी आहे, त्याचबरोबर कामगारांचा पगार, तसेच कौटुंबिक उपजीविका करणेही दुरापास्त झाले आहे. तळेगाव शहरात हातावर पोट असलेले केश कर्तनालय दुकानदार असून त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत शासनाकडून व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.