Talegaon News : चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईत शेतकरी व नागरिकांची मोठी फसवणूक – बाळा भेगडे

एमपीसीन्यूज : 3 जून 2020 रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली असल्याचा आरोप करून त्या निषेधार्थ शुक्रवारी (दि 16) तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिली.

याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मावळ तालुक्यात चक्री वादळामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून 600 एकरपेक्षा जास्त पाॅलिहाऊसचे नुकसान झाले आहे. तर हजारो घरे, पोल्ट्री फार्म, जनावरांचे गोठे आदींची पडझड झाल्याने सुमारे 200 कोटींचे नुकसान झाले आहे.

संबंधित नुकसानीची पाहणी झाल्यानंतर शासनाने तातडीने पंचनामे करण्याचा आदेश दिला होता, परंतु प्रशासनाच्या आदेशाचा दिखावा करण्यात आला.

पाॅलिहाऊसचे पंचनामे करताना राजकीय दबाव तंत्राचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली त्याने सर्वसामान्य व शेतकरी वर्गाचे समाधान झाले नाही.

“राजा उधार झाला, आणि हाती भोपळा दिला ” ह्या म्हणीचा प्रत्यय सर्वसामान्यांना आला. तसेच सर्वसामान्यांना शासनाने वा-यावरच सोडल्याचा आरोपही भेगडे यांनी केला आहे.

या चुकीच्या कारभाराच्या निषेधार्थ शुक्रवार, दि. 16 ऑक्टोबरला वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयाच्या समोर सर्वसामान्य नागरिक व शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.