Talegaon News : उपनगराध्यक्ष निवडणुकीत जनसेवा विकास समिती ‘किंग मेकर’च्या भूमिकेत

समितीची भूमिका भाजपसाठी फायदेशीर; राष्ट्रवादी काँग्रेसची वाढली डोकेदुखी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी उद्या (गुरुवारी) होत असलेल्या निवडणुकीत जनसेवा विकास समिती तटस्थ राहणार असल्याची भूमिका समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी बुधवारी (दि.20) सोमाटणे फाटा येथील पत्रकार परिषदेत मांडली. भाजप व शहर सुधारणा व विकास समितीला स्पष्ट बहुमत नसल्याने जनसेवा विकास समिती या निवडणुकीत तटस्थ राहणे भाजपसाठी फायदेशीर तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखीचे ठरण्याची शक्यता आहे.

पत्रकार परिषदेस नगरसेवक संग्राम काकडे, रोहित लांघे, निखिल भगत, नगरसेविका अनिता पवार, हेमलता खळदे, सुनील कारंडे, मिलिंद अच्युत, सुनील पवार आदी उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक उद्या गुरुवारी (दि.21) होणार आहे. यावेळेस जनसेवा विकास समितीच्या सदस्याला संधी होती. तळेगाव दाभाडे शहर सुधारणा व विकास समितीच्या वैशाली दाभाडे यांना एक वर्षाचा कार्यकाळ दिला होता. त्यावेळी जनसेवा विकास समितीने त्यांना पाठिंबा दिला होता.

त्यानुसार यावेळी जनसेवा विकास समितीच्या सदस्याला संधी होती. मात्र, मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्वयंघोषित नेत्याला जनसेवा विकास समिती व शहर सुधारणा व विकास समितीच्या सदस्यांना एकत्र येऊ द्यायचे नाही, असा आरोप आवारे यांनी केला.

मागील वर्षी शहर सुधारणा व विकास समितीच्या सदस्याला उपनगराध्यक्ष करताना सात ते आठ वेळा बैठका झाल्या होत्या. आता आमच्या सदस्याला संधी असताना शहर सुधारणा व विकास समितीच्या एकाही पदाधिकाऱ्यांनी बैठक तर घेतलीच नाही, तसेच पाठिंब्याबाबत हो किंवा नाही तेही सांगितले नाही.

त्यामुळे जनसेवा विकास समिती ही उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीमध्ये उपस्थित राहून देखिल तटस्थ भूमिकेत राहणार आहे. कोणाच्याही बाजूने मतदान करणार नाही. अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या भूमिकेला आमच्या सर्व नगरसेवकांचा एकमुखी पाठिंबा आहे, असे आवारे म्हणाले.

दरम्यान, शहर सुधारणा व विकास समितीने उपनगराध्यक्षपदासाठी संतोष भेगडे यांचे नाव पुढे केले आहे. जनसेवा विकास समितीच्या या भूमिकेने भाजपला फायदा होणार हे स्पष्ट दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.