Talegaon News : आजच्या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांसोबतच जनतेचा सहभाग महत्त्वाचा : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज – आजच्या परिस्थितीत कायदा, सुव्यवस्था आणि शांतता यासाठी पोलिसांबरोबरच जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये आयुक्तालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनता सुसंवाद कार्यक्रमात आयुक्त कृष्ण प्रकाश बोलत होते यावेळी उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त संजय नाईकपाटील, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस,महिला दक्षता समितीच्या सदस्या, ग्राम सुरक्षादल सदस्य,पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याला आयएसओ हे मानांकन मिळालेले आहे त्याबद्दल विशेष गौरव आणि ग्रामसुरक्षा दल स्थापना, महिला दक्षता समिती महिला मेळाव्याचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. यावेळी ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांना काठी, ओळखपत्रे आणि शिट्टीचे वाटप करण्यात आले तर लवकरच सायकल वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. महिला दक्षता समितीच्यावतीने अध्यक्षा वैशाली दाभाडे यांजकडून आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना कृष्ण प्रकाश म्हणाले कि, सक्षम समाज निर्मितीसाठी शांतता आणि सुरक्षेची गरज आहे, प्रत्येकाने कर्तव्य व आपल्या अधिकाराच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत तसेच समाजाचा विकास होण्यासाठी शांततेची गरज आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात दक्षता समितीचे उद्दिष्ट काय आहे, समिती कशापद्धतीने काम करते आणि समितीला मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत दक्षता समितीच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी याप्रसंगी माहिती दिली. तर ग्रामसुरक्षा दलाच्या वतीने दिलीप डोळस यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात उपायुक्त आनंद भोईटे यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात झालेला प्रशासकीय बदल व आएसओ मानांकनाबाबत तसेच महिला दक्षता समितीच्या कामकाजाबद्दल विशेष कौतुक केले तर महिला दक्षता समितीच्या येथील कामकाज नियोजनाबाबत दक्षता समितीचा तळेगाव पॅटर्न आयुक्तालयाच्या अंतर्गत येणा-या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये राबविणार असल्याचे आर्वजून सांगितले.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी केले तर आभार पोलीस अधिकारी शहाजी पवार यांनी मानले. आणि सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.