Talegaon News : तळेगावात लसीकरण केंद्रांची संख्या वाढवा : अरुण भेगडे

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये कोविड 19 लसीकरण केंद्र व त्यासाठी आवश्यक कर्मचारी वाढवून लसीकरण जलदगतीने करण्याची मागणी सभागृह नेते अरूण भेगडे यांनी मावळ तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी नगरसेवक संतोष दाभाडे, अमोल शेटे, नगरसेविका शोभा भेगडे, काजल प्रदिप गटे, भाजप ओबीसी मोर्चा शहर कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष गणेश भेगडे, अशितोष हेंद्रे, सरचिटणीस प्रदीप गटे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, कोविड 19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. केंद्र शासनाच्या आदेशान्वये पहिल्या व दुस-या टप्प्यातील ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच तिस-या टप्प्यांमध्ये 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे.

सध्या 45 वयोगटावरील नागरिकांची लसीकरण केंद्रात असणारी गर्दी, रांगा पहावयास मिळत आहे. तळेगाव दाभाडे शहरातील लोकसंख्या पाहता 18 वर्षावरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाल्यावर लसीकरण केंद्रात नियुक्त कर्मचारी व इतर अनुषंगीक सोयी सुविधा तोकड्या पडतील.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अजून वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोरोना रूग्ण संख्या कमी करण्याबाबत वेळीच लसीकरण केंद्रे व सोयीसुविधा वाढविणे गरजेचे असून मोठया सोसायट्यांमध्ये लसीकरण केंद्र होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नियोजनबद्ध लसीकरणाचे वेळापत्रक तयार करून होणारा नागरिकांचा त्रास वाचवावा, असेही भेगडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.