Talegaon News :  जैन सोशल ग्रुप व गरवारे ब्लड बँक तळेगाव दाभाडे यांच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे अहिंसेचे पुजारी श्री भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक दिनानिमित्त जैन सोशल ग्रुप व गरवारे ब्लड बँक तळेगाव दाभाडे यांच्या वतीने रविवार (दि 25) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष संजय ओसवाल यांनी दिली.

कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रक्ताचा तुटवडा भासत असल्याने तो तुटवडा भरून काढण्यासाठी जैन सोशल ग्रुप व गरवारे ब्लड बँक तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

रविवार (दि 25) तळेगाव दाभाडे बाजारपेठ येथील जैन भवनमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत शिबीर होईल.  गेली 1988 सालापासून हा उपक्रम भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिनानिमित्त घेतला जातो. सुरक्षित अंतर राखून रक्तदान शिबिर घेण्यात येणार असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

मास्क, सॅनिटायझर व सर्व प्रथम रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास 5 ग्रॅम चांदीचा शिक्का ‘धनगोल्ड’ तर्फे भेट देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे पुणे जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्र राज्यामध्ये रक्ताचा खूप मोठा तुटवडा आहे त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या राज्याला या संकटातून मुक्त करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन प्रकल्प प्रमुख किरण ओसवाल यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.