Talegaon News: सोमाटणे टोल नाक्यावरील वसुली थांबविण्यासाठी जनसेवा विकास समितीकडून कायदेशीर नोटीस

एमपीसी न्यूज – लोणावळा वरसोली व तळेगांव दाभाडे परिसरातील स्थानिक रहिवाशांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर उच्च न्यायालयाचे वरीष्ठ कायदेतज्ज्ञ प्रवीण वाटेगांवकर यांचा कायदेशीर सल्ला घेऊन जनसेवा विकास समितीने केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनी यांना कायदेशीर नोटिस बजावली असून सोमाटणे टोल नाक्यावरील बेकायदेशीर टोल वसुली बंद व्हावी, अशी मागणी केली आहे.

दोन टोल नाक्यांमधील अंतर हे शासकीय नियमांना धरून नसल्याने सोमाटणे टोल नाका हा पुण्याच्या दिशेने योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा अशीही मागणी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे व प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी या नोटीसीद्वारे केली आहे.

तळेगाव दाभाडे परिसरातील स्थानिकांना अचानकपणे जानेवारी 2021 पासून आयआरबी कंपनी प्रशासनाने टोल सुरू केल्याने तळेगांव दाभाडे येथील सर्व पक्षीय प्रमुख नेत्यांनी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांच्या वाहनांना टोलमधून संपूर्णपणे सूट मिळावी याकरीता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले होते. त्या नंतर सर्व पक्षीय प्रमुख नेत्यांनी सोमाटणे टोल नाक्यावर स्थानिकांना टोल मधून संपूर्ण  माफी मिळावी या साठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्याचे योजले होते.

तळेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी कोरोना काळात आंदोलन न करता वाटाघाटीने प्रश्न सोडवण्यासाठी दि 19 फेब्रुवारी 2021 रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक तळेगाव पोलीस स्टेशन येथे आयोजित केली होती. सदर बैठकीला एमएसआरडीसीचे अधिकारी दिलीप शंकरराव व आयआरबीचे अधिकारी वामन राठोड उपस्थित होते.

सदर बैठकीत मावळ तालुक्यातील लोणावळा येथील वरसोलीचा टोलनाका व तळेगांव दाभाडे येथील सोमाटणेचा टोल नाका हा स्थानिक रहिवाशांसाठी टोलमुक्त करण्याचा निर्णय झाला. या संदर्भातील बातम्या वृत्त पत्रात प्रसिध्द झाल्या होत्या.

त्यानंतर एक महिना सर्व सुरळीत सुरू होते परंतु एक महिन्यानंतर सोमाटणे येथील अधिका-यांची भाषा व वागणे बदलू लागले. स्थानिक रहीवाशांकडून पुन्हा टोल वसुली सुरू झाली मार्च, एप्रिल व मे 2021 हे तीन महीने कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन असून सुध्दा टोल कर्मचारी स्थानिक नागरिकांची टोलसाठी अडवणूक करत होते.  टोलमाफीबाबत जीआर आला नाही. त्यामुळे टोल वसूल करावा लागणार असल्याचे आयआरबीचे अधिकारी सांगत होते.

गेल्या पंधरा वर्षांपासून मावळची जनता चुकीच्या जागेवर बसवण्यात आलेल्या टोल नाक्यावर टोल भरत असून सदर टोल वसुली त्वरित थांबवावी व टोल नाका इतरत्र हलवावा, असे सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांनी या वेळी नमूद केले.

पंधरा वर्षात जवळपास दोन हजार कोटी रुपये वसूल झाले आहेत. 2019 नंतर सुरू असलेली टोल वसुली बेकायदेशीर असल्याचा आरोप विधिज्ञ प्रवीण वाटेगावकर यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.