Talegaon News : जीवनाकडे सकारात्मकतेने बघा- कवी प्रवीण दवणे

एमपीसी न्यूज –   सकारात्मकता हेच देणं आणि लेणं आहे. म्हणून मनुष्याने आपल्या अंतरिक उर्जेला ओळखून जीवनाकडे सकारात्मकतेने बघावे, असे प्रतिपादन कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी केले.

तळेगाव दाभाडे येथील हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या 23 व्या वर्धापनदिना निमित्त आयोजित व्याख्यानात ‘जीवन जगण्याची कला’ या विषयावर कवी दवणे बोलत होते. अध्यक्षस्थानी साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे उपस्थित होते.

लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, ॲड. रवींद्र दाभाडे, पतसंस्थेचे चेअरमन पंढरीनाथ दाभाडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, प्रा. दीपक बिचे, विभावरी दाभाडे, संतोष दाभाडे आदी उपस्थित होते.

कवी दवणे म्हणाले, जीवन जगण्याची कला म्हणजे दुस-यांना जगविण्याची कला. वर्तमानात जगण्याची ही कला आहे. आपत्तीचे संपत्तीत रूपांतर करणे ही फार मोठी कला आहे.

जग जवळ आणण्याचे काम कोरोना या व्याधीने केले. व्याधीपेक्षा भयाने जास्त लोकं गेली. म्हणून या काळात जी क्रियाशील होती, गतिमान होती, गतित होती म्हणून ती प्रगतीत होती. या काळात वाचन वाढले, संतांच्या कार्याचे स्मरण झाले पाहिजे, असे ही दवणे यांनी सांगितले .

यावेळी लोणावळा नगरपरिषदेस स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचाविशेष सत्कार करण्यात आला. तर डाॅ. गुणेश बागडे, प्रवीण माने, विलास वाघमारे या कोरोना योद्धांचाही सत्कार करण्यात आला.

‘ जडे जीव ज्याचा!’ या कवी प्रवीण दवणे लिखित पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

संस्थेचे संस्थापक ॲड.रवींद्र दाभाडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव कैलास भेगडे यांनी केले. मानपत्रांचे वाचन विलास शितोळे यांनी केले. आभार प्रदीप गटे यांनी मानले.

 तहसीलदार मधुसूदन बर्गे म्हणाले, संस्थाचालकांनी संस्था चांगल्या आर्थिक स्थितीमध्ये आणून चांगला विश्वास संपादन केला आहे. वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत कोरोना काळात केलेल्या कामांबाबत कोरोना योद्धांचा सन्मान केल्याने संस्थेचे त्यांनी तोंडभरून कौतुकही केले.

 

सुरेश साखवळकर म्हणाले, कर्जवितरण व कर्जवसूली हे कसब महत्त्वाचे असून या संस्थेने या दोन गोष्टींचा बॅलन्स उत्तम सांभाळला आहे. ग्रामीण भागात दारात जाऊन सेवा देता यावी म्हणून संस्थेने मोबाईल व्हॅनद्वारे सेवा द्यावी अशी सूचनाही साखवळकर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.