Talegaon News : अन् झाले ‘त्या’ आजोबांवर विधिवत अंत्यसंस्कार

जनसेवा विकास समितीच्या मिलिंद अच्युत यांनी केले नातेवाईक नसलेल्या आजोबांचे अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज – नातेवाईक नसलेल्या एका वृद्धाचे कोविड 19 मुळे रुग्णालयात निधन झाले. ते ज्या वृद्धाश्रमात राहत होते त्या वृद्धाश्रमच्या संचालिका देखील कोविड 19 या आजाराने ग्रस्त असल्याने मृत आजोबांचे अंत्यसंस्कार कसे करावेत हा प्रश्न होता. संचालिकांनी किशोर आवारे यांना आणि आवारे यांनी मिलिंद अच्युत यांना याबाबत माहिती दिली आणि अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर नातेवाईक नसलेल्या आजोबांचे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तळेगाव दाभाडे यशवंत नगर परिसरातील वानप्रस्थाश्रम या वृद्धाश्रमातील सदस्य विनायक दत्तात्रय वर्तक यांचा कोव्हिड 19 या आजाराने युनिक हॉस्पिटल तळेगाव स्टेशन येथे दुर्दैवी मृत्यू झाला. वानप्रस्थाश्रम तळेगावच्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला छाजेड या स्वतः कोव्हिड 19 या आजाराने ग्रस्त असल्याने हॉस्पिटलमधील प्रक्रिया पूर्ण करणे व या आजोबांचे अंत्यसंस्कार करण्याबाबतचा मोठा प्रश्न उर्मिला छाजेड यांच्या पुढे उपस्थित झाला होता. दिवंगत विनायक वर्तक यांना कुणीही नातेवाईक नसल्याने अंत्यसंस्कार कसे करावेत असा प्रश्न निर्माण झाला होता.

उर्मिला छाजेड यांनी ही बाब जनसेवा विकास समीतीचे अध्यक्ष किशोर आवारे यांना सांगितली, किशोर आवारे यांनी क्षणाचाही विलंब न करता युनिक हॉस्पिटलमध्ये जाऊन दिवंगत रुग्णाबाबत डॉ. विजय इंगळे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली व पुढील कार्यवाही करण्याबाबत मिलिंद अच्युत यांना सूचना दिल्या.

किशोर आवारे व जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी सर्व सोपस्कार पार पाडून दिवंगत आजोबांचे रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले.

किशोर आवारे गोरगरीब लोकांची सेवा अहोरात्र करत आहेत. हीच आमच्या कार्यकर्त्यांची खरी प्रेरणा आहे असे मिलिंद अच्युत यांनी यावेळी सांगितले. तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सहकार्य व मार्गदर्शन केल्याचेही मिलिंद अच्युत म्हणाले.

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी मिलिंद अच्युत यांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.