Talegaon News: नगरपरिषदेतील कोरोना योद्ध्यांसाठी आमदार शेळके यांनी दिले 130 पीपीई किट व 10 पल्स ऑक्सिमीटर

एमपीसी न्यूज – वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेला अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना विरोधात  लढण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने आज (मंगळवार) 130 पीपीई कीट व 10 पल्स ऑक्सिमीटर देण्यात आले.

त्यावेळी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, रवी काळोखे आदि उपस्थित होते.  आमदार शेळके यांनी ही मदत केल्याबद्दल नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 376 वर गेली आहे.

मावळ तालुक्यातील कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार येथील बनेश्वर स्मशानभूमीत केले जात आहेत. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पीपीई कीट व पल्स ऑक्सिमीटरची गरज असल्याचे ओळखून तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी पीपीई कीट आणि शरीरातील ऑक्सीजनची पातळी व ह्रदयाचे ठोके मोजण्यासाठी वापरण्यात येणारे पल्स ऑक्सिमीटर आमदार शेळके यांनी उपलब्ध करून दिले.

नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची मदत केल्याबद्दल उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी आमदार शेळके यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.