Talegaon News : आमदार शेळके यांनी कोविड सेंटरला दिली भेट

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात केंद्र येथील कोविड केअर सेंटरची आमदार सुनिल शेळके यांनी काल (सोमवार दि.12) पाहणी केली. यावेळी कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व रुग्णांशी शेळके यांनी संवाद साधत सर्वांचे मनोबल वाढवले.

तळेगाव दाभाडे येथील सुगी पश्चात केंद्रामध्ये कोरोना संसर्गित लोकांवर उपचार केले जातात. या ठिकाणी 103 सक्रिय रुग्ण असून दररोज या ठिकाणी सुमारे 70 ते 75 नागरिकांची आरटी पीसीआर तर 35 ते 40 जणांचे रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाते. या ठिकाणी 120 पॉझिटिव्ह व 75 संशयित रुग्णांना ठेवण्याची क्षमता असून दररोज डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय असे मिळून 15 जणांचा स्टाफ या ठिकाणी काम करत आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाबाधित रुग्णांवर कमी वेळेत योग्य उपचार करून त्यांना लवकरात लवकर कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, रुग्णांना नातेवाईकांशी संपर्क करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, इंटरनेटचा वापर करण्यासाठी वायफायच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना शेळके यांनी केल्या. यावेळी आमदार शेळके यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवले. रुग्णाचे मानसिक आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यास डॉक्टरांना सांगितले. मावळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. असे आवाहन त्यांनी केले.

कोविड केअर सेंटरमधील उपचार, रुग्णांना दिलेले जेवण किंवा इतर गोष्टीत काही त्रुटी आढळल्यास तक्रार करावी. कोविड केअर सेंटरमध्ये आलेल्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी येथील डॉक्टरांना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. पद्मवीर थोरात यांनी केले.

यावेळी आमदार शेळके यांच्या बरोबर प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.