Talegaon News: विद्यार्थ्यांच्या फी सवलतीसाठी आमदार शेळके यांनी दिले प्रत्यक्ष योगदान

बालविकास शाळेला पाच लाखांचा धनादेश देत केली मदत वाटपास सुरुवात; आमदारांनी दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीतून पाळला

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना फी सवलत देण्याबाबत झालेल्या बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे आमदार सुनील शेळके यांनी शिक्षण संस्थांना एकूण फीच्या पाच टक्के प्रत्यक्ष योगदान देण्यास सुरुवात करीत दिलेला शब्द पाळला. आमदार शेळके यांच्या या योगदानाबद्दल पालक व विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षण संस्थाचालकांकडूनही आभार मानण्यात येत आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील विनाअनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना 35% सवलत देण्याबाबत सोमवार दिनांक 21 रोजी झालेल्या समन्वय बैठकीत सर्वानुमते सहमती झाली होती. यावेळी आमदार शेळके यांनी 5 टक्के फीचा भार उचलण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर आमदार शेळके यांनी प्रत्यक्ष कृतीतून मावळमधील पालकांना दिलेला शब्द पाळला.

तळेगाव दाभाडे येथील स्नेहवर्धक मंडळ सोसायटी अँड एज्युकेशन ट्रस्ट, बालविकास विद्यालय यांच्या नावे असलेला पाच लाखांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे यांच्याकडे आज (बुधवारी) सुपूर्त करण्यात आला. यावेळी आमदारांचे बंधू सुदाम शेळके तसेच गोकुळ किरवे, श्रीकांत टकले, मयूर झोडगे, संजय कासवा आदी उपस्थित होते.

फीमधील पाच टक्के वाटा उचलून आमदार शेळके यांनी पालक वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. टप्प्याटप्प्याने तालुक्यातील सर्व विनाअनुदानित शाळांना विविध माध्यमातून मदत करणार असल्याचे आमदार शेळके यांनी यापूर्वीच सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.