Talegaon News: अस्मिता सावंत यांना न्याय देण्याच्या ‘नूमविप्र’चे लेखी आश्वासन

एमपीसी न्यूज – दिवंगत शिक्षिका मीनाक्षी दिवाकर यांच्या निधनानंतर त्यांच्या वारस म्हणून त्यांच्या कन्या अस्मिता सावंत यांना नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने शक्य ती सर्व मदत केली जाईल तसेच अनुकंपा तत्त्वावर सावंत यांना संस्थेच्या शाळेत लवकरात लवकर नोकरी देण्यात येईल, अशी ग्वाही नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी व नामवंत उद्योजक रामदास काकडे यांनी दिली आहे.

अस्मिता सावंत यांना न्याय मिळवून देण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 24 सप्टेंबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संस्थेच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यांच्या विनंतीनुसार नाईक यांनी उपोषण 24 ऑक्टोबरपर्यंत स्थगित केले होते.

संस्थेच्या वतीने रामदास काकडे यांनी प्रदीप नाईक व अस्मिता सावंत यांच्याशी चर्चा करून त्यांची बाजू समजावून घेतली. त्यानंतर सावंत यांना न्याय मिळवून देण्यासाठी शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन काकडे यांनी दिले. त्याबद्दल नाईक व सावंत यांनी समाधान व्यक्त केले.

अखेर न्याय मिळाला – प्रदीप नाईक

प्रदीप नाईक म्हणाले, “अखेर आम्हाला न्याय मिळाला. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ येथील शिक्षक भरती व आर्थिक बाबींच्या चौकशीसाठी मी तसेच माझी बहीण अस्मिता सावंत यांनी 24 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पुणे येथे भर पावसात उपोषण केले होते. याची दखल घेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, उद्योजक व माजी उपनगराध्यक्ष रामदास काकडे यांनी अस्मिता सावंत यांची बाजू ऐकून घेतली जाणून घेतली व संस्थेकडून जे काही मदत होईल ती आम्ही आपल्याला त्वरित पुरवू व आपला राहिलेला फरक तसेच अनुकंपा तत्वावर होणारी भरती येत्या काळात चालू करणार आहोत. त्या वेळेस आपल्याला तिथे भरती केले जाईल, असे आश्वासन रामदास काकडे साहेब यांनी दिले आहे. एका लेखी पत्राद्वारे त्यांनी हे आश्वासन दिल्याबद्दल आम्ही रामदास काकडे यांचे जाहीर आभार मानत आहोत तसेच येत्या 24 ऑक्टोबरपासून सुरू करणार असलेले उपोषण तूर्त स्थगित करीत आहोत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.