Talegaon News : ‘गंगा’मुळे पवना नदीचे प्रदूषण

प्रदीप नाईक यांचे पर्यावरण मंत्र्यांना निवेदन

एमपीसी न्यूज – बेबडओव्हळ येथील गंगा पेपर्स इंडिया लिमिटेड या कंपनीतील रसायन मिश्रित पाणी पवना नदीत सोडले जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषणात वाढ होत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी दिली.

प्रदीप नाईक यांनी याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन दिले आहे. गंगा पेपर इंडिया लिमिटेड ही कंपनी पेपर पल्प तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीतून रसायन मिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नाल्याद्वारे पवना नदीत सोडले जाते. यामुळे नदीतील माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. आजूबाजूच्या गावातील जनावरे नदीतील पाणी पितात. प्रदूषित पाण्यामुळे जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यात जनावरे दगावत आहेत. नदीमध्ये कपडे धुणाऱ्या महिलांना देखील याचा त्रास होतो.

_MPC_DIR_MPU_II

कंपनीने व्यवसाय करावा, नफा कमवावा त्याचबरोबर नीतिमूल्ये जपून माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपायला हवी. गंगा पेपर्स या कंपनीला नफा कमावण्याच्या नादात सर्व नीतिमूल्यांचा विसर पडला आहे. स्थानिकांच्या आरोग्याशी कंपनीने खेळ करू नये. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करून कंपनी बंद पाडण्यात येईल, असा इशारा देखील नाईक यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.