Talegaon News : ‘निर्धार’ हिंदी चित्रपटाचे आणि ‘मिलन नियती का’ या दूरदर्शन मालिकेचे पोस्टर्स लाँच 

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे बॉलीवूडमधील कलाकार आणि तंत्रज्ञावर कोसळलेल्या बेरोजगारीचे सावट दूर होण्यासाठी काही निर्माते आणि दिग्दर्शक यांनी सहकारातून चित्रपट निर्मिती करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. येथील श्रीशा एंटरटेनमेंट प्रोडक्शन, पुणे आणि दिल्लीच्या V4U प्रोडक्शनने तसा पहिला करार केला असून रविवारी (दि. 22 नोव्हेंबर) त्यांनी ‘निर्धार’ या हिंदी चित्रपटाचे तसेच ‘मिलन नियती का’ या दूरदर्शन मालिकेचे पोस्टर्स लाँच केले.

निर्माता व प्रसिद्ध फिल्म रायटर समीर गौतम आणि निर्माता, दिग्दर्शक नितीन प्रभाकर पानसे यांच्या हस्ते पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आली. यावेळी या चित्रपटातील प्रमुख कलाकार अंकित राठोड, अंजली चौहान, रेवती नाईक, ज्योती गायकवाड यांच्यासह सहकलाकार उपस्थित होते.

समीर गौतम म्हणाले, की स्ट्रगलर्स अर्थात नवीन कलाकारांना प्रामुख्याने संधी देण्याचा प्रयत्न ‘निर्धार’ चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. त्यातून चांगले चेहरे प्रेक्षकांच्या समोर येतील. युवा पिढीतील क्रांतिकारी आचारविचारांचे प्रतिबिंब या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. कमी खर्चात अधिक चांगले चित्रपट देण्याचा हा पर्याय आहे.

दिग्दर्शक नितीन प्रभाकर पानसे म्हणाले, की कलाकारांची निवड जिकिरीची होती. त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. नांदेडचा मराठी कलाकार अंकित राठोड, डेहराडूनची अभिनेत्री अंजली चौहान, जालना येथील मराठी कलाकार दीप्ती जाधव आणि गाव खेड्यातील मराठी युवा लोककलावंत यांना मोठ्या संख्येने प्रथमच हिंदी चित्रपटात व मालिकेत समाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

‘निर्धार’ची कथा भारत ढोले यांनी लिहिली आहे. तर दिग्दर्शक म्हणून नरपत राणावत व नितीन प्रभाकर पानसे संयुक्तपणे काम करत आहेत. समीर गौतम यांच्या V4U प्रोडक्शनने नितिन प्रभाकर पानसे यांची मराठी कंपनी श्रीशा एंटरटेनमेंट प्रोडक्शनशी करार केला असून हा प्रयत्न सफल झाल्यास तो विस्तारण्याचा विचार केला जाईल.

यावेळी नृत्यांगना ज्योती गायकवाड आणि स्थानिक कलाकारांनी त्यांची नृत्ये व अभिनयाची अदाकारी सादर केली. सुंदरम् फिल्म्सचे किरण शिंदे V4U कंपनीच्या मॅनेजर पौर्णिमा सिंग यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.