Talegaon News: मनमानी फी घेणाऱ्या इंग्रजी शाळा चालकांवर गुन्हे दाखल न केल्यास आंदोलन – प्रदीप नाईक
एमपीसी न्यूज – कोविड संसर्गाच्या काळातही मनमानी फी घेणाऱ्या खासगी इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिला आहे.
तळेगाव दाभाडे येथील स्नेहवर्धक मंडळ सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट संचालित डॉ. आण्णासाहेब चौबे हायस्कूलमधील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेल्या तक्रारींचा संदर्भ देऊन नाईक यांनी शिक्षणमंत्र्यांना ई-मेलद्वारे लेखी निवेदन पाठविले आहे.
खाजगी इंग्रजी शाळांच्या मनमानी फी मागणी संदर्भात त्वरित या शाळांवर कारवाई झाली पाहिजे. कोरोनामुळे दीड वर्षांपासून शाळा भरत नाही. ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून या इंग्रजी शाळा वर्ग घेत आहेत. भरमसाठ फी आकारत आहेत. सर्वसामान्य पालक, नोकरी गेल्यामुळे हवालदिल झाला आहे, असे नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे.
फी भरा अन्यथा मुलांना ऑनलाईन क्लासेसमध्ये बसू दिले जाणार नाही. तसेच काही शाळा म्हणतात की येणाऱ्या वर्षांची फी आगाऊ भरा नाही तर दाखले घरी पाठवून देऊ, अशा धमक्या पालकांना देण्यात येत आहेत, असा आरोप नाईक यांनी केला आहे.
हे शाळा चालक आहेत की, सावकारी धंदा करणारे, पठाणी पद्धतीने वसुली करणारे गुंड, असा सवाल नाईक यांनी केला आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात आपला काळा पैसा, पांढरा करायचा, हे तथाकथित स्वतःला शिक्षणसम्राट म्हणवणारे तिसरी ते चौथी पर्यंत जेमतेम शिक्षण झालेले. यांना स्वतःचे नाव देखील लिहिता येत नाही, अशा लोकांकडून शिक्षणाची काय अपेक्षा ठेवायची, असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित केला आहे.
या सर्व इंग्रजी माध्यमातील अनुदानित अथवा विनाअनुदानित शाळा असो एक नवीन विकसित नियमावली खाली आणण्याची गरज आहे. ज्या शाळा चालकांना ही नियमावली मान्य नसेल त्यांची शाळा नोंदणी रद्द करावी. कारण बालकांचा शिक्षण विषयक हक्क कायदयाचे हे उल्लंघन करतात. शाळा चालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
शिक्षणक्षेत्राचे बाजारीकरण होऊ देणार नाही. या साठी राज्यभर आंदोलन छेडले जाईल. बालकांना त्यांच्या शिक्षण घेण्याच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहू देणार नाही, असा निर्धार नाईक यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.
फी वसुलीसाठी दमदाटीचा प्रश्नच येत नाही – चंद्रकांत शेटे
ट्रस्टच्या माध्यमातूनच इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवल्या जातात. त्यामुळे ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही. त्यामुळे दमदाटी किंवा धमकी देऊन वसुलीचा प्रश्न येतच नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची फी कोरोनाच्या काळात वाढवलेली नाही, आम्ही नियमानुसार फी घेतलेली आहे, उलट दुसऱ्या सत्रातील टर्म व इतर फी माफ केलेली आहे. आपल्या तळेगावातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांची सरासरी फी आणि आसपासच्या भागातील नवीन खाजगी शाळा आहेत, त्यांची वार्षिक फी आमच्या शाळांपेक्षा तिप्पट चौपट असल्याचे दिसून येईल. आम्ही कोणत्याही पालकांकडे सक्ती किंवा बळजबरी करत नाही, उलटपक्षी त्यांना हप्त्याने फी भरण्याची सवलत देण्यात आलेली आहे.
– चंद्रकांत शेटे,अध्यक्ष, मावळ तालुका इंग्रजी माध्यम स्कूल असोसिएशन