Talegaon News : नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराची सीआयडी चौकशी करण्याची जनसेवा विकास समितीची मागणी

एमपीसी न्यूज – आजपर्यंतच्या काळात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भ्रष्टाचार झाला नव्हता, 40 कोटींच्या ठेवी असलेल्या नगरपरिषदेला सध्या 20 कोटींची तूट आहे. नगर परिषदेतील पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य, आस्थापना, अग्निशमन, नगररचना, विद्युत विभागात तर हिंदमाता भुयारी मार्ग, जिओ लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा घणाघाती आरोप जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. या भ्रष्टाचाराच्या सीआयडी व न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

जनसेवा विकास समितीच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेस नगरसेवक निखील भगत, रोहित लांघे, समीर खांडगे, माजी नगरसेवक सुनील कारंडे, जनसेवा विकास समिती प्रवक्ते मिलिंद अच्युत तसेच कल्पेश भगत, सुनील पवार, अनिल पवार,अनिल धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

आवारे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील अनेक विभागात झालेल्या भ्रष्टाचाराची विस्तृत माहिती दिली. यामध्ये पाणीपुरवठा विभागात जॅकवेलचे काम न करता नवीन पाईप लाईन टाकणे, नगररचना विभागात नागरिकांना कामासाठी होणारा त्रास व त्यासाठी करण्यात येत असलेली आर्थिक मागणी, नगरपरिषदेतील अग्निशमन विभाग व इतर ठिकाणी ठेकेदारी पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे अल्पवेतन आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. स्मशानभूमीमध्ये काम करणारे कामगार हे नगर परिषदेचे कायम सेवेतील कर्मचारी असून त्यांना ‘कोरोनायोद्धा’ म्हणून सन्मानित करण्याएवेजी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

स्टेशन भागातील उद्यानासाठी चाललेल्या कामात वरिष्ठ लोकप्रतिनिधीने आर्थिक मागणी करणे तळेगावच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब असल्याची खंत आवारे यांनी यावेळी व्यक्त केली. नगराध्यक्ष ठेकेदाराकडे टक्केवारीची मागणी करतात. नगराध्यक्षांची सही नसलेल्या पत्रावर ठेकेदारांना काम देऊन त्याची बिले दिली आहेत, असे आरोप आवारे यांनी केले.

‘इंदरमल ओसवाल हेच तळेगावचे सचिन वाझे’

भाजपचे नेते इंदरमल ओसवाल हे तळेगावमधील ‘सचिन वाझे’ आहेत, अशी टिप्पणी आवारे यांनी केली. ओसवाल यांनी स्वतःचा व आमदार सुनील शेळके यांचा प्लॉट वाचविण्यासाठी हिंदमाता भुयारी मार्गाच्या जागेत बदल केल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला. या चुकीच्या बदलामुळे या भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साठून तो राज्यभर बदनाम झाला, असेही ते म्हणाले.

भुयारी गटार योजनेच्या नावाखाली तळेगाव शहरातील रस्ते खोदून ठेवून नागरिकांची गैरसोय केली आहे. तळे उत्खननातील भ्रष्टाचारावर कारवाई कधी होणार, असा प्रश्नही त्यांनी केला. तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्काय वाॅकच्या मागणीस विरोध कोणी व का केला, असा सवालही त्यांनी केला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये असलेली नावे जाहीर करून त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी आवारे यांनी केली.

सर्वसामान्य जनतेशी चर्चा करूनच निवडणुकीतील भूमिका ठरविणार

भ्रष्टाचार करणाऱ्यांना जनसेवा विकास समिती आगामी निवडणुकीत जागा दाखवून देईन. जनसेवा विकास समितीची सर्वसामान्य जनतेशी बांधिलकी असून सर्वांशी चर्चा करूनच निवडणुकीतील भूमिका ठरविण्यात येईल, असे आवारे यांनी सांगितले. मागच्या निवडणुकीत जनसेवा विकास समितीने भाजपवर आंधळा विश्वास टाकला, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

तळेगाव दाभाडे हद्दीत सुरु असलेला कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नगर परिषदेमध्ये झालेल्या संबधित भ्रष्टाचाराची सीआयडी व न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. या चौकशी समितीत शहरातील पाच प्रतिष्ठीत नागरिकांच्या समक्ष ही चौकशी व्हावी, अशी मागणी आवारे यांनी केली.

 आरोप सिद्ध झाल्यास राजकारण संन्यास घेईन – इंदरमल ओसवाल

महाराष्ट्र शासनाने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा विकास आराखडा 2013 मध्ये मंजूर केला आहे. त्या प्रमाणेच हा हिंदमाता भूयारी पूल त्याच जागेवर झालेला आहे. त्यात बदल करण्याचा अधिकार नगरपरिषदेला नव्हता आणि राहणार नाही. हा आरोप पूर्णपणे निराधार आहे. 2 मे 2017 ला राजीनामा दिला तेव्हापासून माझा नगरपरिषदेशी कुठलाही संबंध नाही, कारभाराबाबत कुठलाही हस्तक्षेप नाही. श्याम पोशेट्टी नावाच्या अधिका-याबरोबर कुठलेही बोलणं वा फोन झाला नाही.

35 वर्षाच्या सामाजिक, राजकीय कार्यात तळेगाव नव्हेतर मावळ तालुक्यात एकतरी व्यक्ती दाखवा, की ज्याचे काम करण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेतले वा आर्थिक फसवणूक केली. हे सिद्ध झाल्यास राजकीय व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेईन. माझ्यावर केलेल्या आरोपाबाबत मी कायदेशीर सल्ला घेऊन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असे इंदरमल ओसवाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.