Talegaon News : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास काकडे

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज, शनिवारी संपन्न झाली. त्यामध्ये नियामक मंडळ पदाधिकारी व सदस्य यांची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी काकडे यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे होते.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

रामदास काकडे – अध्यक्ष, गोरखनाथ काळोखे -उपाध्यक्ष, दीपक शहा-उपाध्यक्ष, शैलेश शहा- खजिनदार, चंद्रकांत शेटे- कार्यवाह, सुरेशभाई शहा, निरूपा कानिटकर, संदीप काकडे, विलास काळोखे, गणेश खांडगे ( सर्व सदस्य).

संस्थेचे सर्व शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक, पालक, आजी माजी विद्यार्थी यांच्यावतीने नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थी ते अध्यक्ष’ रामदास काकडे यांचा दैदीप्यमान प्रवास

सुमारे 35 वर्षांपूर्वी रामदास काकडे इंद्रायणी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. शारीरिक शिक्षणातील पदवीनंतर त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. काकडे परिवारातून उद्यमशीलतेचे बाळकडू मिळाल्याने पुढे त्यांनी उद्योजकतेची कास धरली. चोख व्यवस्थापन आणि विकासाचा दृष्टिकोन यात निष्णात असल्याने माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी त्यांच्यावर इंद्रायणी शिक्षण संस्थेच्या कार्यवाह पदाची धुरा सोपविली.

त्यामुळे काकडे यांच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षात संस्थेचा विस्तार आणि गुणवत्ता यांची वेगवान प्रगती झाली. समाजकारण, राजकारण, शिक्षण आणि उद्यमशीलता यांचे अजब रसायन असलेल्या रामदास काकडे यांच्या नेतृत्वाखाली संस्था गरुड झेप घेईल, असा विश्वास वाटल्याने माजी आमदार भेगडे आणि संचालक मंडळींनी त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.