Talegaon News: सत्तारूढ भाजपने मागितला नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचा राजीनामा, बजावली शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने त्यांच्याच पक्षाच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचा राजीनामा मागितल्याने खळबळ उडाली आहे. पक्षाच्या नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशा अशयाची नोटीस भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र माने यांनी बजावली आहे. त्यामुळे सत्तारूढ भाजपमधील मतभेद निवडणुकीच्या तोंडावर चव्हाट्यावर आले आहेत. 

आमदार सुनील शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांच्यावर जोरदार टीका करून त्यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस नगराध्यक्षा चित्रा जगनाडे अनुपस्थित होत्या. त्याबाबत पत्रकारांनी छेडले असता, पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी जगनाडे यांना पक्षाचे शहराध्यक्ष रवींद्र माने नोटीस बजावल्याची माहिती दिली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अनेक इच्छुक असताना जगनाडे कुटुंबाला असलेल्या पक्षकार्याच्या पार्श्वभूमीचा विचार करुन दिवंगत ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे व सर्व कार्ड कमिटीने विचारांती चित्राताईंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि पक्षाने संपूर्ण ताकद तुमच्यामागे उभी करुन महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून ही आणले, परंतु निवडून आल्यानंतर अगदी सुरुवातीपासूनच पक्षाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून त्यांनी मनमानी कारभार सुरु केला. नगरपरिषदेचे कामकाज करताना आपले सहकारी नगरसेवक-नगरसेविका यांच्याशी कुठलाही समन्वय ठेवला नाही. कार्ड कमिटी व पक्ष संघटना यांना अभिप्रेत असलेली कार्यपद्धती पक्षहित समोर ठेवून चित्राताईंनी कधीही पक्षाला अनुसरून कामकाज केले नाही, असा ठपका पक्षाच्या वतीने जगनाडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

 

नगरपरिषदेमधील जगनाडे यांच्या कामकाजाविषयी अतिशय संशयास्पद वातावरण आहे. त्यांच्यावर गेल्या काही वर्षापासून वेळोवेळी होत असलेल्या गैरव्यवहाराच्या व भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत चालली आहे, असा आक्षेप पक्षानेच घेतला आहे.

 

पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. उलटसुलट होणाऱ्या चर्चामुळे पक्षाचे हितचिंतक असलेले नागरिकांची सुध्दा पक्षाबद्दलची सहानुभूती कमी होताना दिसत आहे. अशा अनेक गोष्टींमुळे महत्वाचे निर्णय, परस्पर बिले अदा करणे याबरोबरच मिटिंग लावण्यासंदर्भात पक्षाच्या भूमिकेच्या किंवा सहकारी नगरसेवकांच्या विसंगत असलेली चित्राताईंची भूमिका कायम पक्षाला अडचणीत आणत आहे, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.

नगरपरिषदमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही आवश्यक असे धोरणात्मक निर्णय घेता न आल्यामुळे पक्षाचे खूप मोठे नुकसान होत आहे. जगनाडे यांनी त्यांच्यावरील आरोपांविषयी लेखी स्पष्टीकरण तीन दिवसांत द्यावे, अन्यथा नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पक्षाची होत असलेली नाचक्की थांबवावी. जगनाडे यांनी विषयानुरुप समाधानकारक खुलासा करुन राजीनामा न दिल्यास त्यांना शिस्तभभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.