Talegaon News : नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी संतोष दाभाडे व समीर खांडगे बिनविरोध

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भारतीय जनता पक्षाचे संतोष हरिभाऊ दाभाडे आणि जनसेवा विकास समितीचे समीर हरिश्चंद्र खांडगे यांची आज (दि 18) रोजी बिनविरोध निवड झाली.

गुरूवारी दुपारी दोन वाजता सभागृहात निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली. पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी सहकार्य केले.

यामध्ये स्वीकृत नगरसेवकपदासाठी संतोष दाभाडे व समीर खांडगे यांच्या नावाचे अंतिम शिफारसपत्र संबंधित पक्षांच्या गटनेत्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले.

दोन जागांसाठी दोनच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असल्याने पीठासन अधिकारी चित्रा जगनाडे यांनी संतोष दाभाडे आणि समीर खांडगे यांची स्वीकृत सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

निवडीनंतर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी व फुलांची, भंडाऱ्याची उधळण करत आनंद व्यक्त केला.

यावेळी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, पक्षप्रतोद अमोल शेटे, जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे आदी उपस्थित होते.

उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक गणेश खांडगे, रजनी ठाकूर, भाजपा शहराध्यक्ष रविंद्र माने, नगरसेवक संतोष भेगडे, भाजपा गटनेते अमोल शेटे, सुरेश दाभाडे, उद्योजक किशोर आवारे, सत्यशीलराजे दाभाडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदींची अभिनंदनपर भाषणे झाली.

माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र दाभाडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष आशिष खांडगे, किरण ओसवाल, निलेश फलके यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

नवनिर्वाचित नगरसेवकांचे कुटुंबातील सदस्य व मित्र परिवारही मोठया संख्येने उपस्थित होते. नंतर कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.