Talegaon News : गुणवत्तापूर्ण बदलांसाठी विद्वानांची मदत घेणार : रामदास काकडे

एमपीसीन्यूज – शैक्षणिक बदलांना सामोरे जाताना गुणवत्तापूर्ण बदलांसाठी परिसरातील विविध क्षेत्रातील अनुभवी विद्वानांची मदत घेणार असल्याचे सूतोवाच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष रामदास काकडे यांनी केले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे आयोजित दीपावली स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गोरखनाथ काळोखे, संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेशभाई शाह, सदस्य सुरेशभाई शहा, गणेश खांडगे, विलास काळोखे, संदीप काकडे, निरूपा कानिटकर, तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य परेश पारेख, प्राचार्य डाॅ. संभाजी मलघे, डाॅ. बी. बी. जैन, प्रा. जी. एस. शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी काकडे यांनी जागतिक पातळीवरील शैक्षणिक बदलांचा आढावा घेतला. ते पुढे म्हणाले, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सर्व शाळा- महाविद्यालयांमध्ये झपाटयाने बदल होत असून पुढील काळात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत.

त्यासाठी सर्व क्षेत्रातील विद्वानांची मदत घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी केंब्रीज विद्यापिठाच्या धर्तीवर केवळ गुणवत्तेला महत्त्व देऊन पुढील काळात सर्व योजना राबविण्यात येणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.

दरम्यान, संस्था कार्याध्यक्ष चंद्रकांत शेटे यांची प्रकट मुलाखत निरुपा कानिटकर यांनी घेतली. त्यावेळी बोलताना शेटे यांनी त्यांच्या जीवनातील संघर्षमय प्रसंग रंगवून सांगितले. ते म्हणाले, की 1975 मध्ये इंदिरा गांधीनी लादलेल्या आणीबाणी विरोधी सत्याग्रहात सहभाग घेतला होता. त्यावेळी मिसा कायद्यातंर्गत कारावास झाला होता.

त्याकाळात घोरवाडी रेल्वे स्टेशन येथे आलेली सोलापूर पॅसेंजर अडवली. या रेल्वेवर आम्ही आणीबाणीच्या विरोधात घोषणा रंगविल्या. त्याचे सात पडसाद देशभर उमटले आणि अमेरिका व इतर देशात बातम्या गेल्या. पुढे आम्हाला अटक करण्यात आली. मी सतरा महिने कारावासात होतो. या करावासामधील अनेक रोमांचक आठवणी त्यांनी या प्रसंगी सांगितल्या.

याप्रसंगी शिक्षक-शिक्षकेतरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. तसेच संस्थेच्या डी.फार्मसी महाविद्यालयाचा निकाल 100% लागल्याबद्दल आणि सर्व विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल प्राचार्य व सर्व स्टाफचे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सर्व स्टाफच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी परेश पारेख यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. वीणा भेगडे व प्रा. के.व्ही.अडसूळ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन प्रा. विद्या भेगडे, उपप्राचार्य ए. आर. जाधव व एस. पी. भोसले यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे नवनिर्वाचित खजिनदार शैलेशभाई शहा यांनी केले. तसेच आभार गणेश खांडगे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.