Talegaon News : नगरपरिषदेच्या शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु करावेत – वैशाली दाभाडे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्ष जून 2021 पासून सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करावेत. अशी मागणी माजी उपनगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका वैशाली दाभाडे यांनी उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे व प्रशासन अधिकारी संपत गावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे व प्रशासन अधिकारी संपत गावडे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी नगरसेविका वैशाली दाभाडे यांच्यासमवेत नगरसेविका मंगल भेगडे, संगीता शेळके उपस्थित होते.

वैशाली दाभाडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे नागरपरिषदेच्या माध्यमातून तळेगाव शहरातील विविध भागात प्राथमिक व माध्यमिक शाळा चालविल्या जात आहेत.या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत सुमारे 1 हजार 694 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

नगरपरिषद शाळांमध्ये सर्व साधारणपणे सामान्य, गरीब तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिकण्यास आहेत, विद्यार्थी शिक्षणासाठी कायम संघर्ष करतात व शिक्षणाच्या प्रवाहात राहावे म्हणून आपण सर्व नगरपरिषदेचा एक घटक म्हणून कायम प्रयत्नशील असतो. शिक्षणाची आवड असणारे आणि त्यासाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात राहून शिक्षण घेणे सोपे जावे म्हणून नगरपरिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करावेत, ज्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी मधून शिक्षण घ्यावयाचे आहे त्यांना तशी संधी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही दाभाडे यांनी निवेदनात केली आहे.

तसेच पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार गाव भागात व स्टेशन भागातील काही निवडक शाळांमध्ये असे वर्ग सुरु करावेत त्याचबरोबर सेमी इंग्रजी माध्यमासाठी येणारा, सर्व खर्च नागरपरिषदेने उचलावा, त्यामुळे अनेक विद्यार्थी पुढील उच्च भविष्यासाठी तयार होतील आणि त्यांच्यामधील असलेली गुणवत्ता देखील त्यांना सिद्ध करता येईल, चालू शैक्षणिक वर्षापासून असे वर्ग सुरू झाल्यास ते अधिक सोईचे होईल असे निवेदनात दाभाडे यांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.