Talegaon News : निराधार व्यसनी इंजिनिअरला ‘स्माईल’चा आधार

एमपीसी न्यूज – उच्चशिक्षित मेकॅनिकल इंजिनिअर व्यसनाच्या आहारी गेला. अपघातात अर्धांगवायू झाल्याने ऐन चाळीशीत नोकरी गेली. मद्यधुंद अवस्थेत तो आईला मारहाण करुन व व्यसनासाठी इकडे तिकडे भटकंती करु लागला. या दिशा भटकलेल्या इंजिनिअर तरुणाला स्माईल व्यसनमुक्ती केंद्राने आधार देत व्यसनापासून परावृत्त केलं आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या हर्षल जोशी याचा चार ते पाच वर्षांपूर्वी अपघात झाला, त्यामुळे अर्धांगवायू नशिबाला आला. ऐन चाळीशीत नोकरी गेली, वडिलांचे देखील निधन झाले. घरादार सोडून व्यसनाच्या आहारी गेलेला हर्षल गेली चार वर्षे आपल्या वृद्ध आईसहित निराधार अवस्थेत रस्त्यावर भटकत होता. शनिवारी (दि.15) हा तरुण तळेगाव रेल्वे स्थानकावर आईला मारहाण करत असल्याची माहिती ‘उडान’ संस्थेच्या संस्थापिका भाग्यश्री ठाकूर यांना मिळाली.

 

ठाकूर यांनी तळेगाव शाखेच्या व्यवस्थापिका नुतन लोणारे यांना त्याठिकाणी पाठविले. त्यांनी हर्षलच्या आईला स्वतःच्या संस्थेत दाखल केले. संस्थेच्या कार्यकर्त्या माधुरी थेटे यांनी त्या व्यसनी तरुणाचा विचार करून स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक हर्षल पंडित यांच्याशी संपर्क साधला. स्माईल’चे हर्षल पंडित, प्रशांत खर्जुले, शितल आठल्ये, जॉयसन चेट्टीयार, प्रणव देशमुख आणि राहुल बोरुडे हे तळेगाव रेल्वे स्थानकावर पोहचले.

 

हर्षल जोशी गेल्या एक आठवड्यापासून उपाशी होता. चार वर्षे भिक मागणं, दारु पिणं आईकडे दुर्लक्ष करणं, मारहाण करणं असे प्रकार तो करत होता. उच्च शिक्षित असूनही दारूच्या व्यसनामुळे त्याची अशी बिकट अवस्था झाली होती. पंडित यांनी तात्काळ पोलिसांना कळवून त्याला आपल्या संस्थेत दाखल करून घेतले. तरुणाची स्वच्छता करण्यात आली, त्याला नवीन कपडे देऊन आवश्यक वैद्यकीय तपासण्या करून घेतल्या व उपचार दिले. दिशा भटकलेल्या इंजिनिअर तरुणाला स्माईल व्यसनमुक्ती केंद्राने आधार दिला आहे.

आवाहन

कुणी निराधार व्यसनी आढळल्यास ‘स्माईल व्यसनमुक्ती केंद्र’, उर्से येथे 8181095959 या नं. वर संपर्क करावा असे आवाहन संचालक हर्षल पंडित यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.