Talegaon News: राज्यस्तरीय युवानेत्याचे ‘ते’ पत्रक उपनगराध्यक्ष निवडणुकीतील नैराश्यातून – किशोर आवारे

एमपीसी न्यूज –  राज्यस्तरीय नेतृत्व करणाऱ्या ह्या युवा नेत्याला स्थानिक दोन-चार वॉर्डमध्ये असणाऱ्या जनसेवा विकास समितीबद्दल पत्रक काढावे लागते म्हणजे कदाचित त्यांना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आलेल्या नैराश्यातून असे पत्रक काढले असेल असे वाटते, अशी खोचक टिपण्णी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी केली.

उपनगराध्यक्ष निवडणुकीत केलेल्या अप्रत्यक्ष मदतीसाठी भाजपने जनसेवा विकास आघाडीला जादा दोन सभापतिपदांचे रिटर्न गिफ्ट दिल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे नगरसेवक संतोष भेगडे यांनी काल प्रसिद्धीस दिले होते. आवारे यांनी संतोष भेगडे यांचा थेट नामोल्लेख न करता त्यांच्या टिकेला उत्तर देणारे पत्रक आज प्रसिद्ध केले आहे. त्यात जनसेवा विकास समितीवरील सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले आहे.

आवारे यांनी म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे शहरातील राज्य स्तरीय युवा नेत्याने एका पत्रकाच्या माध्यमातून जनसेवा विकास समितीवर जी टीका केली आहे, त्याचे सर्वप्रथम जनसेवा विकास समिती खंडन करीत आहे. 28 जानेवारीला झालेल्या विषय समितीच्या निवडणुकीत युवा नेत्याने ‘रात्री आठ’ नंतर निर्णय घेणाऱ्याचे गणित ऐकून पाच-एक-एकच्या फॉर्मुल्याचा हिशेब मांडला. पण प्रत्यक्ष सभागृहात सभापती निवडीच्या वेळेस कोणाचे किती नगरसेवक हजर होते ह्याची माहिती कदाचित ह्या युवा नेत्याला नसावी. ह्या राज्यस्तरीय नेत्याला जर स्थानिक राजकारणाची इतकीच काळजी होती तर त्यांनी त्यांच्या गटनेते व शहराध्यक्ष यांच्याशी चर्चा करून मगच पत्रक काढायला हवे होते.

भाजपा, शहर सुधारणा समिती व जनसेवा विकास समिती यांनी गावाच्या विकासासाठी “जब मिल बैठेंगे तीन यार” या सूत्रानुसार एका सर्वोत्कृष्ट बांधकाम व्यावसायिकाला सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्यात सर्वोत्तम काम करणाऱ्या आरोग्यदुताला आरोग्य समिती, असे सर्वानुमते घेतलेले निर्णय आहेत, असे आवारे यांनी पत्रकात म्हटले आहे.

शिक्षण समिती ही भारतीय जनता पक्षाने त्यांच्या कोट्यातून रिपब्लिकन पार्टीला दिली आहे. जर या युवा नेत्याला ही सर्व पद म्हणजे आम्हाला दिलेलं गिफ्ट वाटत असेल, तर दिवसा ढवळ्या घेतलेले गिफ्ट आम्हाला मान्य आहे. ‘रात्री आठ’ नंतर गिफ्ट घेण्याची संस्कृती जनसेवा विकास समितीमध्ये नाही, असा शेरा त्यांनी मारला आहे.

राज्यस्तरीय नेतृत्व करणाऱ्या या युवा नेत्याला स्थानिक दोन-चार वॉर्डमध्ये असणाऱ्या जनसेवा विकास समितीबद्दल पत्रक काढावे लागते म्हणजे, कदाचित त्यांना उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नैराश्य आले असेल, असे वाटते. राज्यस्तरीय युवा नेत्याने वेळोवेळी तालुक्यात कार्यकर्त्यांवर होणारा खराखुरा अन्याय जनतेसमोर यावा ह्यासाठी प्रयत्न करावेत या साठी खूप खूप शुभेच्छा, असे आवारे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.