Talegaon News : जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाचे यश; कंत्राटी कामगारांना मिळणार थकीत वेतन

एमपीसीन्यूज : तळेगाव नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांना थकीत वेतांसह अन्य सुविधांचा लाभ मिळवून देण्याबाबत नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने जनसेवा विकास समिती आणि कंत्राटी कामगारांनी सुरु केलेले आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, कंत्राटी कामगारांचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार असल्याचा निर्धार जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी केला.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद विभाग प्रमुख व ठेकेदारांच्या संगनमताने कंत्राटी कामगारांची आर्थिक, मानसिक व शारीरिक पिळवणूक केली जात आहे. या कंत्राटी कामगारांना शासनाच्या नियमानुसार वेतन दिले जात नाही. शासनाकडून मिळणारे मूळ वेतन, विशेष सवलती यांची माहिती कामगारांना दिली जात नाही. चार महिन्यांपासून वेतन नसल्याने कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आणली असल्याचा आरोप करीत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आवारात बुधवारी (दि.२३) सकाळी विद्युत, अग्निशमन व आस्थापना विभागातील कंत्राटी कामगारांनी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु केले होते. त्यावेळी आवारे बोलत होते.

याप्रसंगी विरोधीपक्ष नेते गणेश काकडे, नगरसेवक निखिल भगत, रोहित लांघे, नगरसेविका अनिता पवार, प्रवक्ते मिलिंद अच्युत, मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना जिल्हाध्यक्ष सचिन भांडवलकर, माजी नगरसेवक सुनील कारंडे, राहुल खळदे, आरपीआयचे सुनील पवार, कल्पेश भगत, अनिल भांगरे व बहुसंख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते.

किशोर आवारे पुढे म्हणाले, कंत्राटी कामगारांचा छळ करणाऱ्या ठेकेदारांची नावे ब्लॅक लिस्टमध्ये टाका. कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाच्या गलथान कारभाराची चौकशी करण्यात यावी. कामगारांना चार महिन्यांपासून वेतन दिले नाही. वेतनाची मागणी केल्यास कामावरून काढून टाकण्याची ठेकेदार धमकी देतात. स्टँडिंग मिटिंग घ्यायला वेळ आहे, पण शहराचा प्राण असलेल्या कामगारांचा विचार नाही. ‘ ठेकेदार बोले अन नगरपरिषद चाले’, असा कारभार सुरु असल्याचा घणाघात आवारे यांनी केला.

दरम्यान, आज, बुधवारी सायंकाळी नगरपरिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी आंदोलकांच्या मागण्या मान्य करुन लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

कंत्राटी कामगारांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटल्याने कंत्राटी कामगारांनी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांचे आभार मानले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गनाथ साळी, पोलीस कर्मचारी बाबाराजे मुंडे, प्रशांत वाबळे प्रशांत शिंदे, बाळासाहेब कांबळे, सोमनाथ भोईर वैशाली बोरकर यांनी आंदोलनस्थळी कडक बंदोबस्त ठेवला होता.

कामगारांना इएसआय, पीएफ, मूळ वेतन व वेतनातील फरक देण्यात येईल. आंदोलन करणाऱ्या कामगारांना कामावरून कमी करणार नसल्याने लेखी पत्र आवारे यांना देण्यात आले. तसेच ठेकेदारांना वेतन अदा करण्याबाबत झालेल्या दिरंगाईबाबत खुलासा देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.