Talegaon News: तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे सुशील सैंदाणे विजयी

जनसेवा विकास समितीने तटस्थ भूमिका घेतल्याने शहर सुधारणा व विकास समितीचा पराभव

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समितीने तटस्थ भूमिका घेतल्याने तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपचे सुशील सैंदाणे बहुमताने विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पुरस्कृत शहर विकास समितीकडे असलेले उपनगराध्यक्षपद भाजपने पुन्हा खेचून घेतले आहे.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या सुशील सैंदाणे यांना 13 तर शहर सुधारणा व विकास समितीचे अरुण माने यांना सात मते मिळाली. मतदानाच्या वेळी जनसेवा विकास समितीचे सर्व नगरसेवक अनुपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत भाजपच्या वतीने सुशील सैंदाणे यांनी तर शहर सुधारणा व विकास समितीच्या वतीने अरुण माने व संतोष भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, मात्र माघारीसाठी देण्यात आलेल्या मुदतीत संतोष भेगडे यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे सैंदाणे व माने यांच्या सरळ लढत झाली.

नगरपालिका निवडणूक भाजप व जनसेवा विकास आघाडी यांनी एकत्रित लढविली होती. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस प्रणित शहर सुधारणा व विकास समिती तसेच जनसेवा विकास समिती एकत्र आल्यामुळे गेल्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत शहर सुधारणा व विकास समितीच्या वैशाली दाभाडे निवडून आल्या होत्या.

यावेळी जनसेवा विकास समितीला उपनगराध्यक्षपद मिळणे अपेक्षित होते, मात्र शहर सुधारणा व विकास समितीकडून त्याबाबत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेऊन अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करण्याची भूमिका जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी घेतली. त्यानुसार भाजपला पुन्हा उपनगराध्यक्षपद मिळण्यात जनसेवा विकास समितीने ‘किंग मेकर’ची भूमिका बजावली.

_MPC_DIR_MPU_II

तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक वरिष्ठ नेता जनसेवा विकास समिती आणि शहर सुधारणा व विकास समितीला एकत्र येऊ देत नसल्याचा आरोप आवारे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या दुफळीचा फायदा भाजपला उपनगराध्यक्ष निवडणुकीत झाल्याचे पहायला मिळत आहे.

सुशील सैंदाणे यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दुसऱ्यांना उपनगराध्यक्षपद मिळाले आहे. 1995 मध्ये पहिल्यांदा उपनगराध्यक्ष झाले होते. यापूर्वी नगर परिषदेत सत्तारूढ भाजपचे पक्ष प्रतोद म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

सैंदाणे यांची निवड झाल्यानंतर माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, जिल्हा भाजपा खजिनदार इंदरमल ओसवाल, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,  बाळतात्या भेगडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले. अॅड.  श्रीराम कुबेर, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक अमोल शेटे,  मिलिंद अच्युत, भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र माने, माजी शहराध्यक्ष संतोष दाभाडे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष संदीप काकडे, आदींनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.