Talegaon News: ‘सर्वेक्षणाच्या कामासाठी गैरहजर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करा’

आपल्या कर्तव्यावर रूजू होण्याचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांचे आदेश 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या मोहिमेंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. विविध शासकीय कर्मचारी व विविध संस्थेचे कर्मचारी सर्वेक्षण कामात गैरहजर राहिल्यास अथवा दिरंगाई केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा  प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दिला  आहे. 

तळेगाव दाभाडे येथे गुरुवार (दि.24) नागरिकांची कोरोना रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी एक दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तळेगावातील 13 प्रभागांमध्ये पूर्ण नियोजन झाले असून तळेगावातील चार ठिकाणी तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक प्रभागांमध्ये दोन लॅब टेक्निशन, वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक अशी एकूण 580 कर्मचा-यांची  नेमणूक केली आहे.

तपासणी करणाऱ्या स्वयंसेवकास नागरिकांमध्ये कोरोना विषाणू असल्याची लक्षणे आढळल्यास त्याची तपासणी गाव भागामध्ये कन्या शाळा, नगरपरिषद क्रीडा संकुल, तर स्टेशन भागामध्ये नवीन समर्थ विद्यालय, संत ज्ञानेश्वर शाळा याठिकाणी सदर लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांची अँटीजेन टेस्ट होणार आहे.

ज्या शासकीय कर्मचा-यावर या अँटीजेन टेस्ट सर्व्हेक्षणात कामाची जबाबदारी सोपवलेली आहे. अशा 580 कर्मचा-यांपैकी 350 शिक्षक कर्मचारी सर्वेक्षणाच्या कामावर अद्यापि रूजू झाले नाहीत, आपल्या कर्तव्यावर त्यांनी ताबडतोब हजर व्हावे अन्यथा त्यांना गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल आणि त्यांच्यावर कायदेशीर नोटीस बजावून गुन्हे दाखल करून, कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.  त्यांनी कामचुकारपणा केला, तर त्यांची गय केली जाणार नाही. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

सर्व नागरिकांनी या अँटीजेन टेस्ट सर्व्हेसाठी व एक दिवसाच्या लॉकडाऊनला सहकार्य करावे. तसेच या एक दिवसाच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दूध, औषध दुकाने, दवाखाने चालू राहतील, असे मावळ- मुळशीचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.