Talegaon News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या पाच दिवस चालेल्या “मॅरेथॉन” सभेत तब्बल 180 विषयांना मंजुरी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेची 7 वेळा तहकूब झालेली विशेष सर्वसाधारण सभा तब्बल पाच दिवसानंतर या सभेचे कामकाज आज अखेर पुर्ण झाले. त्यामध्ये 180 विषयांना मंजुरी देण्यात आली. या सभेत काही विषयांवर सत्तारुढ आणि विरोधकांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. तर काही विषयावर फारशी चर्चा न करताच विषय मंजूर करण्यात आले.

22 जानेवारीला सुरु झालेली सर्वसाधारण सभा वेळोवेळी 7 वेळा तहकूब होऊन आज अखेर विविध विषयांवर साधक बाधक चर्चा करून पूर्ण झाली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे उपस्थित होते. या सभेत सर्वाधिक वेळ मागील सभेचा वृतांत वाचून कायम करणे या विषयावर विरोधकांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत ताणून धरले.

तळेगाव शहरालगत असलेल्या माळवाडी, सोमाटणे,व तळेगाव शहराच्या हद्दीस लागून असलेल्या नागरी वस्तीच्या घनकच-या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याविषयी सविस्तर धोरण पुढील सभेत घेण्यात यावे असे ठरले.

शहरातील फेरीवाले आणि टपरीधारक यांच्या अंतिम यादीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे. व नव्याने यादी दुरुस्त करावी. त्यासाठी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेवक अरुण माने,निखील भगत यांची त्रिसदस्य समिती गठन करण्यात आली.

या सभेत झोन बदलण्याचा अधिकार या सभेला आहे का ? या विषयावरून सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. तर गाव विभागातील सुभाष मार्केटच्या जागेत शहरातील सर्व शासकीय कार्यालयांना जागा द्यावी, तसेच शहरातील विविध उद्यानातील खेळणी दुरुस्ती, ओपन जिमसाठी साहित्य खरेदी, वृक्ष लागवडीसाठी वृक्ष खरेदीस, तसेच कर्मचा-यांची गणवेश, बूट इतर सुविधासाठी मंजुरी देण्यात आली.तसेच शहरात फ्लेक्स लावण्यासाठी नगर परिषदेत आवश्यक शुल्क भरणे गरजेचे असून शुल्क न भरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे ठरले.

या सभेच्या कामकाजामध्ये गटनेते किशोर भेगडे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, अरुण माने, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, संगीता शेळके,सभागृहनेते अमोल शेटे, अरुण भेगडे पाटील, शोभा भेगडे, कल्पना भोपळे, विभावरी दाभाडे, रवींद्र आवारे, निखील भगत,हेमलता खळदे, अनिता पवार आदींनी सहभाग दर्शविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.